- निकृष्ट दर्जाची आणि विनापरवाना उत्पादित औषधे आढळल्याने कारवाई..
- पुरवठादार कंपनीवर तीन वर्षांची बंदी, उत्पादक कंपनी ब्लॅकलिस्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | शुक्रवार (दि. २० नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) सेंट्रल मेडिकल स्टोअरमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. तपासणीदरम्यान सुमारे १ कोटी ७२ लाख रुपये बाजारमूल्याचा औषधसाठा जप्त करण्यात आला. या साठ्यात निकृष्ट दर्जाची तसेच आवश्यक परवानगीशिवाय उत्पादित केलेली ॲलोपॅथिक औषधे आढळल्याचे समोर आले आहे.
वायसीएममधील औषधांच्या गुणवत्तेबाबत संशय निर्माण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वतःहून FDA कडे तक्रार केली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी औषधसाठ्याची तपासणी करून नमुन्यांची गुणवत्ता पडताळली. या तपासणीच्या निष्कर्षांनंतर संबंधित औषधसाठा जप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणात औषधांचा पुरवठा करणाऱ्या मे. श्री विनायक फार्मा या कंपनीवर महापालिकेने कठोर कारवाई केली आहे. या कंपनीला पुढील तीन वर्षे महापालिकेच्या निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तसेच जेजुरी येथील औषध उत्पादक मे. इंडुकेअर फार्मास्युटिकल्स अँड रिसर्च सेंटर या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे.
रुग्णालयातील औषधांच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर
महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयातील औषधसाठ्यातच निकृष्ट आणि विनापरवाना औषधे आढळल्याने आरोग्य व्यवस्थेतील खरेदी प्रक्रिया, औषधांची गुणवत्ता तपासणी आणि पुरवठादारांवरील नियंत्रण याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित या प्रकरणात जबाबदारी निश्चित करून भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

















