न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जून २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने गांधीनगर, पिंपरी येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकासाठी इमारत बांधण्यात आली आहे. मात्र, त्या ठिकाणी ग्रंथालय, अभ्यासिका व माहिती केंद्र सुरू करण्यात आलेले नाही. सदर काम येत्या ५ महिन्यांत सुरू करण्याचे आश्वासन पालिका अधिका-यांच्या बैठकीत समिती पदाधिका-यांना देण्यात आले.
स्मारक समिती पदाधिका-यांसमेवत सोमवारी (दि. २४) रोजी पालिका भवनात झालेल्या बैठकीत महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक कार्यकर्त भापकर, कांबळे आणि समितीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.
स्मारकाचे काम गेल्या २ वर्षापासून ठप्प आहे. सदर इमारतीमध्ये क्रीडा, भूमि व जिंदगी व स्थापत्य विभागाचे प्रशासकीय कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्या ठिकाणी ब्रिटीश लायब्ररीच्या धर्तीवर सुसज्ज मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात येणार आहे. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील माहिती देणारी यंत्रणा असावी, हे स्मारक राष्ट्रीय दर्जाचे हवे, असे मुद्दे पदाधिका-यांनी उपस्थित केले.
महापौर राहुल जाधव यांनी ग्रंथालय विकसित करण्याचे काम तात्काळ हाती घेण्यात येईल. फुले यांचे जीवनपट उलगडणारी यंत्रणा बसविण्यात येईल. या कामासाठी पालिकेच्या सन २०१९ – २० च्या अर्थसंकल्पात १० लाखांचे लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे. त्यात वर्गीकरणातून ५ कोटींच्या निधीची वाढ केली जाईल. या कामासंदर्भात निविदा प्रक्रिया राबवून येत्या ५ महिन्यांत प्रत्यक्ष कामास सुरूवात केली जाईल व कार्यालयाचे स्थलांतर केले जाईल, असे आश्वासन दिले.











