- उतारावरून भरधाव आलेल्या आयशर टेम्पोची बसथांब्यावर उभ्या विद्यार्थ्यांना धडक..
- वाल्हेकरवाडीत विद्यार्थ्यासह आणखी दोघांचा मृत्यू..
सुरज करांडे, प्रतिनिधी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- बोपदेव घाटात बुधवारी (दि. २५) दुपारी भीषण अपघात झाला. उतारावरून भरधाव वेगात आलेल्या आयशर टेम्पोने बसस्थानकावर उभ्या असलेल्या ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांना धडक दिली. या दुर्घटनेत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका विद्यार्थिनीचा समावेश आहे.
https://www.facebook.com/share/r/1KjqJ6r7m8/
मृत विद्यार्थ्यांची नावे सिद्धेश जयप्रकाश राजे (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), विशाल सुनील दांगडे (रा. जे. पी. नगर, किरकटवाडी फाटा, नांदेड-सिंहगड रोड) आणि मोहिनी जितेंद्र चौधरी (रा. कामठे वस्ती, हडपसर, साधना विद्या मंदिरजवळ) अशी आहेत. तर सोहम घंगाळे (रा. राजुरी, ता. जुन्नर) आणि श्वेता यशवंत तळेकर (रा. रामनगर, रामटेकडी) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सोहम याच्यावर इनामदार रुग्णालयात, तर श्वेता हिच्यावर रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
https://www.instagram.com/reel/DgKqosIIkgL/?cnvx=MnhvemJsNHY0YjBq
मिळालेल्या माहितीनुसार, आयशर टेम्पोने (एमएच ०४ एफडी ७६५४) प्रथम हुंडाई व्हेन्यू कारला (एमएच १२ वायएन ३२४७) पाठीमागून धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो बसथांब्यावर उभ्या विद्यार्थ्यांच्या दिशेने गेला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक प्रतीक मारुती चव्हाण (वय २२, रा. घुलेश्वर, माळशिरस, ता. पुरंदर) याला ताब्यात घेतले आहे. येवलेवाडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

















