- नियुक्तीपासून वेतन अदा करण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणा..
- शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष सौंदणकर यांची आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २६ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत नियुक्त करण्यात येणाऱ्या कामगारांची नियुक्तीपूर्वी पोलीस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करावी. तसेच प्रत्येक कामगाराची बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य करून प्रत्यक्ष उपस्थितीच्या आधारेच कंत्राटदारांची देयके अदा करावीत, अशी मागणी शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटक तथा रमा मंगल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष रमाकांत सौंदणकर यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांची (दि. २६) भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.
यावेळी त्यांच्यासोबत सुमित कांबळे, सूरज भराटे आणि सुभाष मालुसरे आदी उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ‘महापालिकेच्या स्वच्छता, सुरक्षा, आरोग्य, उद्यान, पाणीपुरवठा, विद्युत यांसह विविध विभागांमध्ये कंत्राटदारांमार्फत मोठ्या संख्येने कामगार नियुक्त केले जातात. मात्र, या कामगारांची चारित्र्य पडताळणी होते का आणि कंत्राटदारांकडून दाखविण्यात येणारे सर्व कामगार प्रत्यक्षात कामावर हजर असतात का, याची काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. कागदोपत्री कामगारांची संख्या अधिक दाखवून प्रत्यक्षात कमी कामगारांकडून काम करून घेतले जात असल्यास महापालिकेच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे.
पुढे त्यांनी प्रत्येक कंत्राटी कामगाराची नियुक्तीपूर्वी पोलीस यंत्रणेमार्फत चारित्र्य पडताळणी करावी. कामगारांचे छायाचित्र, ओळखपत्र, नियुक्तीचे ठिकाण आणि चारित्र्य पडताळणीचा तपशील महापालिकेकडे जमा करणे कंत्राटदारांना बंधनकारक करावे. तसेच सर्व कामगारांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करून त्यांच्या दैनंदिन उपस्थितीची डिजिटल नोंद ठेवावी. विशेष म्हणजे, बायोमेट्रिक उपस्थितीची पडताळणी केल्याशिवाय संबंधित कंत्राटदारांची बिले मंजूर करू नयेत. बनावट हजेरी, कामगारांची संख्या वाढवून दाखविणे किंवा अनुपस्थित कामगारांची नावे उपस्थिती पत्रकात नोंदविणे असे प्रकार आढळल्यास संबंधित कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करावी. गंभीर प्रकरणांमध्ये कंत्राट रद्द करून संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी अपेक्षा संतोष सौंदणकर यांनी व्यक्त केली.
नव्याने प्रसिद्ध होणाऱ्या सर्व निविदांमध्ये चारित्र्य पडताळणी आणि बायोमेट्रिक हजेरीच्या अटींचा स्पष्ट समावेश करावा. या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र नियंत्रण यंत्रणा निर्माण करावी. नागरिकांच्या करातून जमा होणारा सार्वजनिक पैसा हा जनतेच्या हितासाठीच खर्च झाला पाहिजे. कंत्राटी कामगारांची नियुक्ती, प्रत्यक्ष उपस्थिती आणि कंत्राटदारांना होणारे आर्थिक भुगतान या तिन्ही स्तरांवर पारदर्शकता असणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रशासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने अंमलबजावणी करावी.
– मा. संतोष सौंदणकर, शिवसेना पुणे जिल्हा संघटक, अध्यक्ष – रमा मंगल फाउंडेशन…

















