न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहराचे जैवविविधता संवर्धन आराखडा अहवालाचे सोमवारी (दि. १) रोजी सादरीकरण करण्यात आले. शहरासाठी लोकांची जैवविविधता नोंदवही बनविणे, शहराच्या जैवविविधतेच्या निर्देशांकाचे मूल्यांकन करणे, स्थानिक जैवविविधता धोरण व कृती योजना तयार करण्याचे काम कले जाणार आहे. त्यातून जैवविविधतेचे जतन करण्याचे पाऊल पालिकेने उचलले आहे.
अहवालाचे सादरीकरण मुंबईच्या टेरेकॉन इकाटक प्रायव्हेट लिमिटेड एजन्सीमार्फत सोमवारी (दि. १) रोजी करण्यात आले. या वेळी आयुक्त श्रावण हडीकर, जैवविविधता समितीच्या अध्यक्षा उषा मुंढे, सदस्या झामाबाई बारणे, सुवर्णा बुर्डे, अनुराधा गोरखे, सहशहर अभियंता मकरंद निकम, उद्यान अधिक्षक सुरेश साळुखे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, कनिष्ठ अभियंता दिग्विजय पवार, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. टेरेकाॅनचे प्रतिनिधी अशोक जैन, डाॅ. निनाद राऊत, अक्षय नाचणे, अभिजीत जगताप यांनी आतापर्यंत झालेल्या व प्रस्तावित कामांची सविस्तर माहिती दिली.
आयुक्त हर्डीकर म्हणाले की, शहराच्या जैवविविधतेची माहिती पुणे विद्यापीठ, इतर महाविद्यालय, संस्था आदी ठिकाणी असल्यास त्याचा या कामासाठी उपयोग करावा. तसेच, ‘सीएसआरमधून इन्व्हायरमेंट सस्टेनेबेल’ अंतर्गत निधी उपलब्ध करण्याबाबत विचार केला जाणार आहे. जैवविविधता संवर्धनासाठी संभाजीनगरातील बहिणाबाई चौधरी उद्यान, तळवडेतील ‘टी’ ब्लॉक या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी पार्क, बायोडायव्हर्सिटी इन्फर्मेशन सेंटर, बटरफ्लाय गार्डन, फिश विटांग सेंटर आदी विकासकामे करण्याबाबत प्रस्ताव तयार करण्याची सूचना यावेळी देण्यात आली.











