- मागील घोषणांची अजुनही अंमलबजावणी नाहीच – उद्योजक अभय भोर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ जुलै २०१९) :- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुस-या टर्मचा पहिला अर्थसंकल्प संसदेत आज शुक्रवार (दि. ५ जुलै) रोजी सादर केला. याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी या अर्थसंकल्पाबाबत आशा-निराशाजनक भाष्य केले.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले असून, त्यात त्यांनी म्हटले आहे की, सरकारने आजच्या अर्थसंकल्पामध्ये निश्चितच उद्योगांसाठी भरघोस तरतुदी जाहीर केलेल्या असल्या तरी, ते एक प्रकारचे मृगजळच वाटते. परकीय उद्योजकांसाठी रेड कार्पेट अंथरले असून, भारतात बंद पडलेल्या उद्योगांसाठी एकही योजना जाहीर केलेली नाही. परदेशी कंपन्यांची गुंतवणूक २५ वरून वाढल्याचे पहावयास मिळते.
इलेक्ट्रिकल वाहन उद्योगाला चांगल्या संधी प्राप्त होतील. फॅसिलिटी सेंटर तसेच काही उद्योगांसाठी क्लस्टर उपलब्धता, मार्केटिंगसाठीच्या चांगल्या योजना आहेत. ५९ मिनिटात एक कोटी कर्ज सर्वसामान्य उद्योगांना नाही. त्यामध्ये कागदपत्रांच्या जाचक अटी आहेत. दोनशे दहा किलोमीटर मेट्रो प्रकल्पामुळे इंजिनिअरिंग उद्योगांना चांगल्या संधी प्राप्त होतील. छोट्या मोठ्या उद्योगांना पाच लाखापर्यंत कर नाही, ही चांगली गोष्ट आहे. दर महिन्याला एक रिटर्न भरावा लागेल. हा उद्योजकांना दिलासा आहे. इलेक्ट्रिक, कपडा व काही उद्योगांना पाच टक्के कस्टम ड्युटी मागे घेतल्यामुळे दिलासा मिळाला. तसेच, इलेक्ट्रिकल व काही उद्योगांना कस्टम ड्युटीमध्ये सूट दिल्यामुळे निश्चित फायदा होईल.
नवीन उद्योजकांना कर्ज योजनांचा फायदा होईल. परंतु, कागदपत्रे व योजना कार्यान्वित करण्यास विलंब होतो. देशात वीज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून, देण्यात येणार आहे. परंतु, वीजवाहक तारा अंडरग्राउंड करण्यासाठी कुठलीही तरतूद नाही. औद्योगिक क्षेत्राला मूलभूत सुविधांसाठी कोणतीही योजना नाही. नऊ कोटी शौचालयाची निर्मिती केली, असे जाहीर केले असले तरी, महाराष्ट्रातील एकाही औद्योगिक परिसरात महिलांसाठी शौचालये नाहीत.
अर्थसंकल्प तसा पाहिला तर, उद्योजकांना दिलासादायक आहे. परंतु, मागील ज्या घोषणा सरकारने केल्या होत्या, त्या अजूनही पूर्णत्वास आलेल्या नाहीत, असे भोर यांनी या पत्रकात म्हटले आहे.
अर्थसंकल्पाचे विश्लेषण पाहण्यासाठी भोसरी एमआयडीसी येथे अनेक उद्योजक एकत्र आले होते. यावेळी उद्योजक अध्यक्ष अभय भोर, बाळासाहेब नीलजकर, माळी, अनंतराव कुलकर्णी, श्रीकृष्ण नरहरी, सोनू ओहरी, अतुल खैरनार, महाजन व इतरही उद्योजक उपस्थित होते.











