न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची कचरा व्यवस्था बिघडली आहे. भोसरी एमआयडीसी परिसरातही तीच बोंब. नवीन घंटागाड्या घेऊनही कित्येक दिवस औद्योगिक परिसरात न फिरकल्यामुळे कचऱ्याची समस्या अतिशय गंभीर बनली आहे. लवकरात लवकर यावर कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा फेको आंदोलन करणार येईल. त्याची जबाबदारी सर्वथा महानगरपालिकेची असेल, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी एमआयडीसी परिसरामध्ये गाड्या थांबलेल्या दिसतात. परंतु, कचरा उचलला जात नाही. त्याचा परिणाम कामगारांच्या आरोग्य आणि परिसरातील मुक्या जनावरांवर होत आहे. कंपन्यांमध्ये कचरा साठवून ठेवल्यामुळे कंपनीमध्ये दुर्गंधी व मच्छर यांनी थैमान घातले आहे. महानगरपालिकेची आरोग्यविषयक औषध फवारणीसुद्धा नसते. कंपन्यांमध्ये उद्योजकांनी कचऱ्यांचे ढीग करून ठेवलेले आहेत. पिशव्यांमध्ये बाहेर टाकायचा तर लगेच दंड आकारला जाण्याची भीती. परंतु, नाईलाजास्तव कचरा बाहेर टाकला जातो. परिसरात एकसुद्धा कचरा कुंडी नाही. त्यामुळे उद्योजक द्विधा मनस्थितीमध्ये आहेत. महापालिकेने सर्व कंपन्यांमध्ये कचऱ्यासाठी डस्टबीन उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ओला व सुका कचरा वेगळा ठेवता येईल.
कंपनीमध्ये कचरा साचून ठेवल्यामुळे कामगारांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक परिसर हा महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येतच नाही? अशा प्रकारे कायम दुजाभाव केला जातो. औद्योगिक परिसर आहे म्हणून पिंपरी चिंचवड शहराचे नाव आशिया खंडात सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून होते. आयुक्तांचा फक्त स्मार्ट सिटी करण्यावरच जास्त भार आहे. स्मार्ट सिटी वगळता शहरात बहुसंख्य प्रश्न पडून आहेत. त्याकडे आयुक्तांनी लक्ष पुरवावे. कचरा समस्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा फेको आंदोलन करणार येईल. त्याची जबाबदारी सर्वथा महानगरपालिकेची असेल, असे अभय भोर यांनी या पत्रकात म्हटले आहे.












