- असंघटित कामगार काँग्रेस शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांची आयुक्तांकडे मागणी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जुलै २०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीमध्ये ७१ झोपडपट्ट्या असून त्या कित्येक वर्षांपासून आहे त्याच ठिकाणी वसलेल्या आहेत. झोपडपट्टीतील झोपडीधारकांना त्यांच्या हक्काची झोपडी मिळावी यासाठी त्याचा पुरावा म्हणून फोटोपास मिळावा, अशी कित्येक वर्षांपासून मागणी होत आहे. परंतु, फोटोपासच्या नावाखाली झोनिपू विभागातील काही पदाधिकारी, राजकीय ताकदीचा वापर करून झोपडीतील नागरिकांची आर्थिक फसवणूक करत आहेत.
झोपडपट्टी धारकांना फोटोपास काढून देतो म्हणून ५० हजार, ६० हजार ते लाख रुपयांपर्यंत त्या नागरिकांची फसवणूक केली जाते. त्याचप्रमाणे फोटोपासच्या नावाखाली प्रत्येक झोपडपट्टीमध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे प्रत्येक झोपडपट्टी धारकांचे हजारो रुपयांची लूट सर्रासपणे चालू आहे.
या सर्व प्रकाराला चाप बसविण्याकरिता पिंपरी चिंचवड मनपाने कायद्याप्रमाणे प्रत्येक झोपडीधारकांची पुराव्याची कागदपत्रे मागवून प्रत्येक झोपडी धारकांना लवकरात लवकर फोटोपास मिळवून द्यावा व त्यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक थांबवावी, अशी मागणी असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी मनपा आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


















