न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ ऑगस्ट २०१९) :- शिरूरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आज गुरुवारी (१ ऑगस्ट) रोजी पिंपरी-चिंचवड शहराच्या दौऱ्यावर आले होते. खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच डॉ. कोल्हे यांनी महापालिका आयुक्तांसमवेत प्रलंबित प्रश्नांवर चर्चा केली. पालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याबरोबर खासदार कोल्हे यांची बैठक संपन्न झाली. बेकायदा बांधकामे, शास्तिकर, रेडझोन, कचरा समस्या, पुण्याचा कचरा मोशीत टाकण्याचा प्रकार, नाशिक फाटा ते मोशी दरम्यानचे सहापदरी रस्तारूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय यासह इतर स्थानिक मुद्दय़ांवर बैठकीत चर्चा झाली.
त्यानंतर खा. कोल्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी महापौर मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, माजी विरोक्षी पक्षनेते दत्ता साने, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, शहरातील अवैध बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, शहरातील कचरा समस्या, नाशिक फाटा ते मोशी दरम्यानचे सहापदरी रस्तारूंदीकरण, भोसरीचे रुग्णालय अशा विविध प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यासोबत चर्चा केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे कंत्राटदाराचा फायदा होईल अशा पद्धतीने निविदा का काढल्या जातात? अशी शंका यावेळी उपस्थित केली. आयुक्तांना त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. स्मार्ट सिटीअंतर्गत कोणते आणि किती प्रकल्प सुरु झाले आहेत. त्याची माहिती घेतली. भोसरीतील रुग्णालयाचे खासगीकरण करण्यात येऊ नये, अशी सूचना केली. रेडझोनची सविस्तर माहिती घेतली. तो प्रश्न सुटावा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. रेडझोन परिसरातील नागरिकांना महापालिकेतर्फे सोयी-सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचनाही आयुक्तांकडे केल्याचे त्यांनी सांगितले.












