तातडीने सूत्रे हालताच पालकमंत्र्यांची शिष्टाई
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ सप्टेंबर २०१९) :- सत्ताधारी भाजपने पारदर्शक कामाची हमी देत महापालिकेत शिरकाव केला. मात्र, जस-जसे दिवस जात गेले, तस-तसा सत्ताधाऱ्यांना पारदर्शकतेचा विसर पडत गेला. आता तर अतिरेकच झाला. सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाला प्रभागातील समस्यांसंदर्भात महापालिकेच्या मुख्यालयासमोरच आंदोलन करावे लागले.
मुख्य म्हणजे उपोषण कालावधीत सत्ताधारी पदाधिकारी या नगरसेवकाकडे फिरकलेच नाहीत. शेवटी राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी या आंदोलनस्थळी भेट दिली. तसेच आंदोलनास पाठींबा दर्शविला. यात राष्ट्रवादीचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेवक मयूर कलाटे, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.
पवना धरणात १०० टक्के पाणीसाठा असतानाही नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही. पिंपळे निलख, विशालनगर परिसरात केवळ दहा ते वीस मिनिटे पाणी येते. पुरेशा पाण्याअभावी नागरिकांची ससेहोलपट होत आहे. कृत्रिम पाणीटंचाई केली जाते. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही, अशा आदी मागण्यांसाठी भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी आंदोलन केले होते.
आंदोलनाला विरोधी पक्षाने पाठींबा देताच भाजप पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. तसेच राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन यांनी पालकमंत्री चंद्रकात पाटील यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून उपोषण मागे घेण्यास सांगितले. तसेच येत्या सात दिवसात सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यानंतर कामठे यांनी सरबत घेऊन उपोषण मागे घेतले. यावेळी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी सभापती विलास मडिगेरी आदी उपस्थित होते.















