न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ सप्टेंबर २०१९) :- पुणे शहरासह जिल्ह्यातील ५ तालुक्यांना काल रात्री धुवांधार पावसाचा फटका बसला. शहरांसह ग्रामीण परिसरातील सखल भागात घरांमध्ये पाणी शिरले, नदी-नाल्यांना पूर आले. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १४ जण दगावले असून ९ जण बेपत्ता आहेत. पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदतीसाठी एनडीआरएफची ५ पथके कार्यरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे शहरावर पावसाच्या रूपाने बुधवारी संकटच ओढवलं. मंगळवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने बुधवारी मध्यरात्री रौद्रावतार धारण केला. सिंहगड, धनकवडी, सहकारनगर, कात्रज या भागातील सोसायट्या आणि घरामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. तर मनुष्यहानीसह जनावरंही दगावली आहे.
पाण्यासह कात्रज भागात पन्नासहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहून गेल्या आहेत. मदतकार्य मोहिमेदरम्यान एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाला आणखी सिंहगड परिसर आणि सहकार नगरात दोन मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांचा आकडा वाढत चालला आहे.
गुरूवारी पहाटे पाच वाजेपर्यंत पुण्यात ९० मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. पुढील पाचही दिवस पुण्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.












