न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संभाजीनगर, चिंचवड येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे होते. यावेळी नितीन सोनवणे, रितिका शर्मा आणि विल्यम साळवी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बैठकीत मतदार यादी विशेष सखोल पुनर्परीक्षण मोहीम, बूथ कमिट्यांची स्थापना, संघटनात्मक बांधणी आणि स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कार्याचे कौतुक करणारा ठरावही मंजूर करण्यात आला.
यावेळी बोलताना बनसोडे यांनी कार्यकर्त्यांना मतदार यादी पुनर्परीक्षण मोहिमेत सक्रिय राहण्याचे आवाहन केले. आगामी काळात जनतेच्या प्रश्नांवर विविध आंदोलनांद्वारे लढा उभारला जाईल, मात्र सध्या मतदारांची नावे सुरक्षित ठेवण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, नवीन शहर काँग्रेस कार्यकारिणीची घोषणा येत्या आठवड्याभरात करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.















