न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १५ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपळे गुरव व वैदू वस्ती येथील शाळांमध्ये ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला.
आजचे युग एआय, नवतंत्रज्ञान आणि स्पर्धेचे असल्याने महापालिका शाळांतील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठी आधुनिक शिक्षण, डिजिटल साधने आणि आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. शासनाच्या शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहनही आमदार जगताप यांनी केले.
“आजचे युग हे एआय आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे आहे. महापालिका शाळांतील विद्यार्थी या स्पर्धेत कुठेही मागे पडू नयेत, यासाठी त्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच कौशल्यपूर्ण बनवणे ही आपली जबाबदारी आहे. ‘पीएम-श्री’ आणि ‘स्मार्ट सिटी’च्या माध्यमातून आपण शाळांचे डिजिटलायझेशन करत आहोत. कोणतीही शाळा केवळ विटांची भिंत नसून उद्याचे राष्ट्र घडवणारे मंदिर आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” – शंकर जगताप, आमदार…















