न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये ४११ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर सध्या प्रशासनाने २० टक्के वाढीव या पद्धतीने ईव्हीएम मशीन उपलब्ध केल्या आहेत. तसेच या विधानसभा निवडणुकीसाठी एका उमेदवाराला ४ उमेदवारी अर्ज कार्यालयीन वेळेत ४ ऑक्टोबर रोजी पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत शासकीय सुट्टी वगळता दाखल करता येणार आहेत.
सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवाराला अर्जासोबत १० हजार रुपयाची अनामत रक्कम भरावी लागेल. मात्र, उमेदवार अनुसुचित जाती प्रवर्गातील असल्यास पाच हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
अर्ज भरण्याच्या प्रक्रियेपासून ते मतमोजणी होईपर्यंत ही निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये २ हजार ४६६ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. या कर्मचाऱ्यांची नियुक्तीही करण्यात आली असून मतमोजणीनंतरच या कर्मचाऱ्यांना कामावरून सुट्टी मिळणार आहे.












