न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०१९) :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ५ ऑक्टोबरला आपण पहिली प्रचारसभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत प्रवेश केला. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राज ठाकरे यांनी नरेंद्र पाटील पक्षातर्फे निवडणूक लढतील अशी घोषणा केली.
शेतकरी धर्मा पाटील यांनी मंत्रालयात विष प्राशन करत आत्महत्या केली होती. नरेंद्र पाटील हे त्यांचे पुत्र आहेत. नरेंद्र पाटील यांच्यासोबत शिवसेनेचे नाशिकचे नगरसेवक दिलीप दातीर यांनीदेखील मनसेत प्रवेश केला.
दरम्यान यावेळी राज ठाकरे यांनी पहिल्या प्रचारसभेची जागा अद्याप ठरली नसल्याचं सांगताना लवकरच कळवू अशी माहिती दिली. प्रचार सुरु झाल्यावर जे काही सांगायचं ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगेन असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.















