- प्रचाराचा अंतिम दिवस गाजविला पावसाने
- पावसामुळे उमेदवारांची निराशा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात जवळपास दोन आठवड्यांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची आज शनिवारी सायंकाळी सहा वाजता सांगता होणार आहे. त्यामुळे आता शहरवासियांना उत्सुकता लागली आहे ती मतदानाच्या दिवसाची.
आरोप-प्रत्यारोप आणि वैचारिक किंवा विकासाच्या मुद्दय़ांवर बोलण्याऐवजी एकमेकांची उणीदुणी काढण्यासाठी नेत्यांनी गाठलेली खालची पातळी यामुळेच यंदाचा प्रचार अधिक गाजला. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षातील दिग्गज नेत्यांनी पदयात्रा, रॅलीद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, प्रचाराचा अंतिम दिवस गाजविला तो पावसाने पावसाने आज पहाटेपासूनच रिमझिम हजेरी लावत उमेदवारांच्या आशांना सुरुंग लावला, मात्र, तरीही मतदारांनी भर रिमझिम पावसात मतदारांशी संपर्क साधला
निवडणूक प्रचारात आरोप-प्रत्यारोप, वैयक्तिक टीकाटिप्पणी ही होतच असते. पण यंदा पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा निवडणुकीत प्रचाराची पातळी ओलांडली गेली. प्रचाराला कमी वेळ असल्याने प्रचारात एकूणच रंगत निर्माण झाली. चिंचवड व भोसरीमध्ये दुरंगी तर, पिंपरीत तिरंगी लढतीमुळे प्रचाराची व्यापकता वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरामुळे भाजप शिवसेनेला मिळालेल्या यशानंतर यंदा सर्वच पक्षांनी या माध्यमाचा दणक्यात वापर करून घेतला, तर सोशल मीडियावरूनही जाहिरातींचा धडाका लावला. मात्र, विकासाचे मुद्दे मांडण्याऐवजी एकमेकांवर आगपाखड करण्यातच प्रचाराचा बहुतांश वेळ गेल्याचे दिसून आले.
विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर रोजी मतदान होत असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. आज शेवटच्या दिवशी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारांकडून प्रचार फेऱ्यांचे आयोजन केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जात आहे. आत यापुढे छुप्या पद्धतीने प्रचार करण्यावर उमेदवारांकडून भर देण्यात येईल.















