न्यूज पीसीएमसी नेटवर्क
- आ. महेश लांडगे यांच्या विजयी संकल्प सभेत प्रतिस्पर्धी विलास लांडे यांना केले लक्ष
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०१९) :- विलास लांडे हा भोसरीचा नागोबा आहे. लोकसभेला शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात हा नागोबा फणा काढून बाहेर आला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुंगी वाजवली हा नागोबा कुठल्या कुठे बिळात गायब झाला. विधानसभेला बाहेर आला, मागील वेळी पक्षाने त्याची वाट लावली. यावेळी जनता त्याची वाट लावेल, असे प्रतिपादन पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारासाठी भोसरी गावजत्रा मैदान येथे आयोजित सभेत खासदार बापट बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार अमर साबळे, शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महापौर राहुल जाधव, महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीचे सभापती विलास मडीगेरी, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा शैला मोळक, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे आदी उपस्थित होते.
यावेळी खा. बापट म्हणाले की, विलास लांडे हे माझे मित्र आहेत. मात्र, हसण्यात एक नंबर, फसवण्यात दोन नंबर आणि कामात तीन नंबर आहेत. पार्टीने त्यांचे जे हाल केले आहेत ते पाहून त्यांचे वाईट वाटते. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही यावेळी खा. बापट यांनी टिका केली. ते म्हणाले की, शरद पवार यांची ईडी चौकशी लागली तेव्हा अजित पवार यांनी राजीनाम्याचे नाटक केले. शरद पवार यांच्यावर झालेला फोकस स्वत:वर घेतला. निवडणूक लागली आणि कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी परदेशात जाऊन बसले. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बळीचा बकरा ठरले आहेत. कॉंग्रेस राष्ट्रवादीचे राजकारण अस्थिर झाले आहे.
यावेळी खा. बापट पुढे म्हणाले, लहानपणी आम्ही ‘ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा’ असे गाणे म्हणायचो. आज ‘ये रे ये रे पावसा विलास म्हणतो तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा महेश झाला मोठा’ असे गाणे म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, ज्यांना पैसा वाटायचा त्यांना वाटू दे. राष्ट्रवादीच्या पापाचा पैसा महाराष्ट्रातील जनता स्वीकारणार नाही. राष्ट्रवादी व कॉंग्रेसला भोसरी मतदारसंघात उमेदवार मिळाला नाही. लांडे यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ का घेतले नाही? तुमचे बारा कुणी वाजवले? असा सवाल खा. बापट यांनी केला.
शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, भोसरी हा महाराष्ट्रातील एकमेव मतदारसंघ आहे, की जिथे निवडणूक जाहिर होण्याआधीच निकाल ठरला होता. महेश दादा लांडगेच निवडून येणार हे ठरले होते. लांडगे यांनी आपलं सर्वस्व झोकून देऊन मतदारसंघाला वेळ दिला. महाराष्ट्रापेक्षा या मतदारसंघात वेगळे काही करावे, यासाठी त्यांनी व्हिजन २०-२० अंतर्गत विकास कामे केली. व्यक्ती म्हणून महेश लांडगे हे दिलदार व आदर्श व्यक्तीमत्व असल्याचे आढळराव-पाटील म्हणाले.
खासदार अमर साबळे म्हणाले की, ही विजयी संकल्प सभा आहे की, विजयी सभा आहे? असा प्रश्न पडावा इतका मोठा प्रतिसाद सभेला आहे. दहा गाव दुसरी एक गाव भोसरी असं ज्या भोसरीचं वर्णन केलं जात त्या भोसरीचा महेश लांडगे हा लाडका नेता आहे. त्यांनी पाच वर्षात कामाचा डोंगर उभा केला. परिवर्तन हेल्पलाईनच्या माध्यमातून लोकांच्या समस्या मार्गी लावल्या.
महापौर राहुल जाधव म्हणाले, पाणी समस्येबद्दल राष्ट्रवादी बोलत आहे, मात्र पाण्याचे योग्य नियोजन केले असते तर आजची अवस्था झाली नसती. चिठ्या देऊनसुद्धा ज्यांना भाषणे वाचता येत नाहीत त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये.















