- उसने अवसान घेणाऱ्या सोबत राज्यातील जनता उभी राहत नाही
- शिवसेना पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना घातली साद…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली. भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं महाशिवआघाडीचं सगळं ठरलेलं असतानाच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. आमदारांची फाटाफूट, पळवापळवी टाळण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आपल्या शिवसेनेनं काळजी घेतली. आता बहुमत चाचणीच्या वेळी निर्णय होणार असल्याच कळतं. शिवसेना सत्तेसाठी एवढीही लाचार नाही की, सत्तेसाठी बाळासाहेबांचा स्वाभिमान गहाण ठेवेल. तेव्हा आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब भाजपच्या गाढवी महत्वकांक्षेपोटी आपली झालेली फरफट व त्यातून मोडलेला युतीचा संसार ही सारी घडामोड राज्यातील समस्त जनतेनं पहिलेली आहे. राज्यचं भलं करण्याच्या उद्देशापासुन भाजपनं आपल्याला वेळोवेळी कसं तोंडघशी पाडलं. हे राज्यातील समस्त जनतेनं उघड्या डोळ्याने पाहिलं आहे. त्यामुळे आता राज्यातील जनताही शिवसेनेच्या पाठीशी आहे. राष्ट्रवादी-कॉंग्रेसच्या अंतर्गत कलहातून निर्माण झालेली सत्तापिपासू वृत्ती याला आता शिवसैनिक कंटाळला आहे. त्यामुळे नको ती सत्ता आपण विरोधात बसू अनं राज्यातील जनरेट्याच्या लाटेवर बाळासाहेबांचे स्वप्न साकार करू, अशी साद शिवसेना पिंपरी विधानसभेचे समन्वयक विजय गुप्ता यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे घातली आहे.
या पत्रकात विजय गुप्ता यांनी म्हटलं आहे की, जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत आपली युती होऊ शकते हे समजलं तेव्हा माझ्यासह या अखंड हिंदुस्तानातील सच्च्या शिवसैनिकांच्या छातीत लोखंडाची सळई घुसल्यासारख्या वेदना झाल्या… आपण लाचारी करून या लोकांसोबत सत्ता मिळवायची? असा प्रश्न त्यावेळी माझ्यासह तमाम शिवसैनिकांना पडला होता. शिवसैनिक हा गरीब असला तरी लाचार आणि विकाऊ नाही, तो स्वाभिमानी आहे” हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर जगणारा हा शिवसैनिक आहे. मात्र, या सत्तेत आपल्याला छत्रपतींच्या छाव्यासारखीच वागणूक मिळणार, आपलं आस्तित्व अबाधित राहणार असं तुम्ही सांगितल्यावर तमाम शिवसैनिक या सत्तेत सहभागी होण्यास तयार झाला होता. मात्र, आज राज्यातली परिस्थिती काही औरच सांगताना दिसत आहे. जरी राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्ष आपल्याशीच इमान राखत असल्याचे भासवीत असले तरी, आज त्यांच्या पक्षातील बात काही वेगळीच सांगते. त्यामुळे आतापर्यंत झालेला दगाफटका सहन करून तमाम शिवसैनिक शांत बसला. मात्र, हे ही विसरून चालणार नाही की, शिवसेनेचे कॅरेक्टर हे एका आक्रमक विरोधी पक्षाचे आहे. त्याला काही प्रमाणात खिळ बसताना दिसत आहे. नजीकच्या काळात आपली ओळखच चोरण्याच षड्यंत्र सुरु होईल. त्यामुळे आपण जनतेने दिलेला कौल मान्य करून विरोधी बाकावर बसत पुन्हा जनतेच्या कामात झोकून देवूया.
बाळासाहेबांच्या शिवसैनिकांच्या अंतरंगात भगव्याचे तुफान सदैव उसळतच आले आहे. हा रंग तेजाचा, त्यागाचा आणि स्वाभिमानाचा आहेच. त्यापेक्षा सचोटीचा आहे. म्हणूनच शिवरायांच्या राज्यात प्रत्येकाने भगव्याची शान राखून राजकारण करावे. नाही तर ‘उपरे’ छातीवर बसतील, हा विचार महाराष्ट्रात रुजवला तो शिवसेनाप्रमुखांनी. विचार हाच जीवनाचा पाया आहे. विचारामुळेच चळवळी होतात. जोश निर्माण होतो. राज्ये घडवली जातात. हिंदवी स्वराज्य निर्माण झाले तेसुद्धा शिवरायांनी टाकलेल्या एका विचाराच्या ठिणगीने. संयुक्त महाराष्ट्राचा वणवा पेटला तोसुद्धा ‘स्वाभिमान’ या विचाराने. शिवसेनेची स्थापना आणि वादळ उठत राहिले त्यामागेही एका विचाराची मशाल होती आणि आहे. भगवा रंग हीच प्रेरणा आहे. उसने अवसान आणून प्रेरणा घेता येत नाही. राज्यातील उभी जनता आपल्या बाजूने आहे. आपली फरफट पाहून राज्यातील जनताही धायमोकलून रडत आहे. येत्या दोन दिवसात महाशिवाघाडीच्या राज्यातील सत्तास्थापनेबाबत काही तोडगा न निघाल्यास माझ्यासह राज्यातील तमाम जनता व शिवसैनिकांची आब राखून धनी माग फिरा अशी पुन्हा एकदा कळकळीची साद मी तुम्हास घालत आहे, असे या पत्रकात विजय गुप्ता यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले आहे.












