न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात भाजपाने अवैध पद्धतीने सत्तास्थापन केली. बहुमत नसताना हे सरकार सत्तेत आलं आहे. कर्नाटक, गोवा, मणिपूर येथे बहुमत नसताना भाजपाने सरकार स्थापन केलं होतं. याची आठवण करुन देत ‘हे गोवा नाही तर महाराष्ट्र आहे’ इथं काहीही खपवून घेतलं जाणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपाला इशारा दिला आहे. मुंबईतील हॉटेल ग्रँट हयात येथे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मिळून १६२ आमदारांचे महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले, यावेळी पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सरकार स्थापनेसाठी संसदीय पद्धतीची जी मार्गदर्शक तत्वे आहेत त्याला कसा हरताळ फसला जातो हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदा भाजपाने दाखवून दिले आहे. इतर राज्यांमध्ये त्यांनी हेच केले आता महाराष्ट्राची वेळ आली आहे. आमच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांची संख्या सत्तास्थापनेसाठी पुरेशी आहे त्यामुळे उद्याही आम्ही बहुमत चाचणीला सामोरे जायला तयार आहोत. मात्र, उद्या सुप्रीम कोर्ट बहुमत सिद्ध करण्याबाबत निर्णय झाल्यानंतर ही कार्यवाही करण्यात येईल.
किमान समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे सरकार लोकशाही मार्गाने या महाराष्ट्रात आपण निर्माण होईल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतरची कार्यवाही संपल्यानंतर राज्यपालांना तुम्हालाच सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावे लागेल, असा विश्वास यावेळी शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना यावेळी दिला.












