न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असतानाही दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे टँकरलॉबीला प्रोत्साहन मिळते आहे. तसेच सोसायट्यांचे आर्थिक बजेटही कोलामडले आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठ्याचा निर्णय आम्हाला अमान्य असल्याचे सांगत, चिखली, मोशी, चहोली हाउसिंग सोसायटी फेडरेशन तसेच नगरसेवक वसंत बोराटे यांनी हा निर्णय मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
पवना धरणामध्ये मुबलक पाणी असतानाही शहराला पाणीकपातीचा सामना करावा लागतो आहे. पाणीसमस्यांमुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनाही रस्त्यावर उतरावे लागते आहे. यापूर्वीही सत्ताधारी नगरसेवकांनी पाण्यासाठी आंदोलन केले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका सर्वसामान्यांना सोसावा लागतो आहे. चिखली, मोशी, जाधववाडी परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांसह बैठ्या घरांनाही पाण्याचा त्रास सहन करावा लागतो आहे. या परिसरामध्ये बिल्डरांकडून महापालिका प्रशासन आणि नेत्यांच्या आशिर्वादाने पाणीपुरवठ्याबाबत अजब हमीपत्र लिहून घेतलेले आहे. मात्र कोणताही बिल्डर ह्या हमीपत्रानुसार सोसायट्यांना त्यांच्या खर्चाने पाणीपुरवठा करताना दिसून येत नाही.
या विषयावर सातत्याने तक्रारी करूनही संबधितांवर कारवाई न केल्याने सोसायटीधारकांवर अन्याय झाला आहे. त्यामध्ये अजून भर म्हणजे दिवसाआड पाणी पुरवठ्याच्या निर्णय घेतला आहे, त्याला विरोध असल्याचे सोसायट्यांच्या सदस्यांनी सांगितले. मागील महिन्यामध्ये मोशी परिसरातील रिव्हर रेसीडेन्सी सोसायटीतील नागरिकांनी पाणी मिळत नसल्यामुळे मतदान न करण्याचा निर्णय घेतला. तसेच चिखलीतील संस्कृती सोसायटीमध्ये दररोज दोन ते तीन टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. यामुळे सोसायट्यांचे आर्थिक बजेट कोलमडले जात असल्याचा सोसायटीतील रहिवाश्यांचे म्हणणे आहे. सोसायटीसह शहरातील या उपनगरातील नागरिक कृत्रिम पाणीटंचाईला वैतागले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात पाण्याचा प्रश्न न सुटल्यास पालिकेवर हंडा मोर्चा आणणार असल्याचा इशारा नगरसेवक बोराटे यांनी दिला आहे.















