- दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्या – विजय गुप्ता
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०१९) :- तेलंगणाची राजधानी असलेल्या हैद्राबाद येथील महिला पशुवैद्यकीय डॉक्टर डॉ. प्रियंका रेट्टी यांच्यावर नराधमाने अमानुषपणे बलात्कार करून जिवंत जाळून हत्या केली. ही घटना उजेडात येताच देशभर खळबळ उडाली. रात्री घरी जाताना त्यांची दुचाकी पंक्चर झाली होती. त्यानंतर त्या एकट्या असल्याचे पाहून आरोपींनी हे कृत्य केले. या घटनेतील बलात्कार आणि हत्या करणाऱ्यांना लवकरात लवकर फासावर लटकवावे. यासाठी शासनाने कठोर पाऊले उचलावीत, अशी मागणी शिवसेना पिंपरी विधानसभा समन्वयक विजय गुप्ता यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे, ”हैद्राबाद येथील घटना संपूर्ण मानव जातीला काळिमा फासणारी अमानवीय घटना आहे. याबाबत सर्वांनाचा लाज वाटावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली येथील निर्भया व महाराष्ट्रातील कोपर्डी हत्याकांड प्रकारानंतर अश्या गुन्ह्या विरोधात कठोर कायदा करण्यात आला होता. तरीदेखील असे गुन्हे वारंवार घडतच आहेत. त्यामुळे असे गुन्हे करण्याऱ्यावर दहशत बसावी असे कायदे आणि निर्णय घेण्यासाठी जनमताचा रेटा तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही गुप्ता म्हणाले.
आपल्या समाजात जे बलात्काराला पोषक वातावरण तयार झालेले आहे, ते बदलण्याची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अशा गंभीर गुन्ह्यांसाठी जन्मठेप असणे आणि खटले तातडीने निकाली काढणे आवश्यक आहे. स्त्रियांवरील अत्याचार थांबवायचे असतील तर मुली-स्त्रियांना सर्व दृष्टीने सक्षम होण्यासाठी, निर्भयपणे वावरता येण्यासाठी वातावरण तयार करावे लागेल आणि पुरुषप्रधान मानसिकता बदलावी लागेल. हैदराबाद घटनेमधील सामील असलेल्या त्या नराधमांचा गुन्हा फास्टटेक न्यायालयात चालवून, सहा महिण्याऐवजी २० दिवसाच्या आत निर्णय द्यावा आणि या दोषींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी, असे या पत्रकात गुप्ता यांनी म्हटले आहे.












