न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ डिसेंबर २०१९) :- पवना नदी ताथवडे परिसरातील नदीत मासे मृतावस्थेत आढळले आहेत. त्याबाबत पालिकेच्या पर्यावरण विभागाने आज गुरुवारी (दि. ५) रोजी पाहणी केली. पाहणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य कार्यवाही करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सांडपाणी मिसळल्यामुळे थेट नदीत सोडण्यात येत असल्याने पवना नदी दिवसेंदिवस प्रदूषित होत आहे. मागेही केजूबाई बंधाऱ्यातील दूषित पाण्यामुळे मासे मृत अवस्थेत आढळले होते. नदीपात्रातील पाणी आणि मृत मासे अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी आणि पालिकेच्या पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांनी ताथवडेतील स्मशान भूमीशेजारील नदी पात्राची पाहणी केली. मृत माशांचा खच पडला असून कासवाचाही मृत्यू झाल्याचे पाहणीत आढळले. ताथवडे गावापर्यंत जे नाले थेट नदीत सोडले आहेत, त्या ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले.












