न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिका पाणीपुरवठा विभागाने २५ नोव्हेंबरपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. त्यासाठी समन्यायी पाणीवाटपाचे कारण पुढे केले. तथापि, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केल्यापासून शहरातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. कमी दाबाने आणि दुषित पाणी येत आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज (शनिवारी) आयुक्त श्रावण हर्डीकर यांची चिंचवड, अॅटो क्लस्टर येथे भेट घेतली. शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याची समस्या त्यांच्यासमोर मांडली. येत्या आठ दिवसांत पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात यावा. अन्यथा शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला आहे.
यात जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, शिरुर जिल्हा महिला संघटिका सुलभा उबाळे, सहसंपर्क प्रमुख, कामगार नेते इरफान सय्यद, महापालिका गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक अमित गावडे, नगरसेविका मीनल यादव, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, सरिता साने, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके, चिंचवड विधासभा प्रमुख अनंत को-हाळे, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, आशा भालेकर आदी शिष्टमंडळात सहभागी झाले होते.
खासदार बारणे म्हणाले, ‘शहरात कृत्रीम पाणीटंचाई निर्माण केली आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्याने सुधारणा झाली नाही. त्याउलट तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. संपुर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. प्रशासनाकडून तक्रारींना केराची टोपली दाखविली जाते.
माजी खासदार आढळराव म्हणाले, ‘प्रशासन आणि आयुक्त पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात अपयशी ठरले आहेत. आजपर्यंत उन्हाळ्यात सुद्धा कधीच पाणीटंचाई जाणवली नाही. आता हिवाळ्यातच पाणी टंचाई जाणवत आहे. पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास नागरिकांचा उद्रेक होईल. तत्काळ पाणीकपात मागे घेऊन शहरवासीयांना दररोज पाणीपुरवठा सुरु करावा’. ‘आंद्रा-भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम अत्यंत संथ गतीने सुरु आहे. हे काम वेगात करण्यासाठी अनेक मी वर्षांपासून प्रयत्न करत आहे. परंतु, नियोजनाचा अभाव असलेले प्रशासन काहीच करत नाही.















