- महापालिकेने गांभीर्याने विचार करीत नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा
- सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात स्वाइन फ्लूसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण आढळून येत असतानाच, थेरगाव येथील पडवळनगर परिसरात डेंग्यूमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एका महिन्याच्या कालवधीत घडला. या सर्व प्रकाराला महापालिकेचा आरोग्य विभागच जबाबदार आहे. वेळीच हालचाल केली असती तर, त्या चिमुकल्यांचा जीव वाचला असता, अशी हळहळ सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी व्यक्त केली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचा शुक्रवारी (दि १३) रोजी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला तर, त्याचाच ९ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर २०१९ रोजी दुदैवी अंत झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. तर, चिमुकल्याचे वडील हमीद मानियार यांच्या मोठ्या भावाची ३ वषार्ची मुलगी देखील तापाने फणफणली आहे. या परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुन्या पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले. मात्र, हे काम करताना जुने कनेक्शन आहे, त्या अवस्थेत ठेवण्यात आले असल्याच्या तक्रारी परिसरातील नागरिक वारंवार करीत होते. मात्र, त्याकडे महापालिकेने कानाडोळा केला, असेही चाबुकस्वार म्हणाले.
पिंपरी चिंचवड शहरात उशिरापर्यंत झालेल्या पावसामुळे तिन्ही नद्यांना पूर आला होता. पवना, इंद्रायणी, मुठा या नद्यांच्या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत अनं नियोजन योग्य पद्धतीने न झाल्यामुळे शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू यांसारख्या विविध साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. मनपा प्रशासनाने बघ्याची भूमिका घेत या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. या परिसरात दिवसागणिक लोकांची संख्या वाढत आहे. महानगरपालिकेचे पूर्णतः या आजारांच्या उपाययोजनांवर दुर्लक्ष असल्याने आज हा प्रकार घडला आहे, असेही चाबुकस्वार म्हणाले.
महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या गलथानपणामुळे नागरिकांना मानसिक व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. स्मार्ट सिटीकडे जात असताना नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडेच प्रशासन लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोणतीही घटना घडल्यानंतर महानगरपालिका त्यावर कारवाई करते. परंतु, वेळेआधीच महापालिकेने उपाययोजना करणे अपेक्षित असते. मनपा प्रशासनाने आता तरी या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच त्या चिमुकल्यांच्या आई-वडिलांना महापालिकेच्या वतीने भरीव आर्थिक मदत करावी, असे या पत्रकात चाबुकस्वार यांनी म्हटले आहे.












