न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे थेरगाव येथील पडवळनगर परिसरात डेंग्यूमुळे दोन सख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा प्रकार एका महिन्याच्या कालवधीत घडला आहे.
उजेर हमीद मणियार (वय ४, रा. पडवळनगर, थेरगाव) या चिमुकल्याचे शुक्रवारी (दि १३) रोजी पहाटे ४ वाजता मृत्यू झाला तर त्याचाच ९ महिन्याचा लहान भाऊ अदनान हमीद मणियार याचा १६ नोव्हेंबर १९ रोजी दुदैवी अंत झाला. महिना उलटण्याच्या आतच एकाच घरातील दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याने नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.
तर चिमुकल्याचे वडील हमीद मानियार व आई रिजवाना यांची देखील बिकट अवस्था झाली आहे. याच परिसरात गेल्या आठवड्यात आणखी एका तरुणाला डेंगूची लागण झाली होती. तर मणियार यांच्या मोठ्या भावाची ३ वषार्ची मुलगी देखील तापाने फणफणली आहे. या परिसरात गेल्या आठ महिन्यापूर्वी जुने पिण्याच्या पाण्याचे पाईप काढून नवीन टाकण्यात आले. मात्र हे काम करताना जुने कनेक्शन आहे त्या अवस्थेत सोडण्यात आले.












