- चेंज अलायमेंटचे भवितव्य महापालिका आयुक्तांच्या भूमिकेवर अवलंबून – विजय पाटील….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- घर बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून १४ जून २०१७ पासून आंदोलन सुरू आहे. या रिंग रोड विरोधी आंदोलनास नुकतेच ९०० दिवस पूर्ण झाले. या प्रदीर्घ लढयानंतर विद्यमान चिंचवड विधानसभा आमदार यांनी नुकतेच चेंज अलायमेंट करिता विद्यमान आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र दिले. सदरच्या पत्राबाबत आयुक्त किती गांभीर्याने तातडीने निर्णय घेऊन ठोस पावले उचलतात हे उत्सुकतेचे असणार आहे व त्यावरच चेंज अलायमेंटचे भवितव्य अवलंबून राहणार आहे, अशी माहिती घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी दिली.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले की, ‘ नागरिक हिताचा इतिहास पाहिला तर अनधिकृत प्रश्न व शास्तिकर प्रश्न अशा मोठ्या प्रश्नाबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्याकडून व लोकप्रतिनिधींकडून जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रश्न जैसे थेच आहेत. लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी सदर चा प्रश्न निकाली लागला म्हणून आनंदोउत्सव साजरा केला, पेढे वाटले, हारतुरे घेतले, मोठे मोठे फ्लेक्स लावले, फटाक्यांची आतिषबाजी केली, हे सर्व आम्हीच केले अश्या वल्गनाही केल्या, त्या प्रश्नांवर निवडणुकाही लढल्या, काही आमदार झाले काही खासदार झाले मात्र सदरचे प्रश्न जैसे थेच राहिले, असेही पाटील म्हणाले.
पिंपरी चिंचवडच्या रहिवास्यांची ससेहोलपट मात्र वर्षानुवर्षे तशीच होत राहिली. असाच एक मोठा यक्ष प्रश्न एचसीएमटीआर बाबत शहरात सध्या सुरू आहे. १९८६ पासून सदरचा प्रकल्पाबाबत घोळ सुरू आहे. या बाबत पालिका आणि प्राधिकरण या दोनही संस्था एचसीएमटीआर बाबत गंभीर नसल्याचे उघड झाले आहे. गेल्या ३५ वर्षात सदर प्रकल्प फक्त कागदावरच राहिला, त्याला दृश्य अस्तित्त्वाचे स्वरूप कधीही प्राप्त झाले नाही, असेही पाटील म्हणाले.
सद्यस्थितीत जोपर्यंत पालिका आयुक्त, लोकप्रतिनिधी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्रावर ठोस निर्णय घेऊन एचसीएमटीआर मध्ये बदल करीत नाहीत तोपर्यंत विशेष घटक कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. त्याकरिता आता आयुक्तांची भूमिका अतिशय महत्वाची असणार आहे. आयुक्तांनी सदरच्या प्रकल्पाच्या रूट बदलाबाबत कायदेशीर प्रक्रिया (due to process low) राबवून निर्णय घेणे क्रमप्राप्त असणार आहे. जोपर्यंत सदरच्या रूट मध्ये बदल होत नाही तोपर्यंत विशेष घटक कायदेशिरपणे रूट (विकास आराखडाअ) मध्ये डीपी बदल करू शकत नाहीत. त्यामुळे आता विशेष घटकाची एचसीएमटीआर प्रकरणी अंतिम परीक्षा असणार आहे. अश्या वरील कायदेशीर व योग्य कारणांमुळे घर बचाव संघर्ष समिती एचसीएमटीआर बाबत सावध भूमिकेमध्ये असणार आहे व गाफीलही राहणार नाही व जोपर्यंत रस्ता बदलाबाबत विशेष घटक कायदेशीर मान्यता देऊन त्याची अंमलबजावणी करत नाही तोपर्यंत समिती संघर्ष हा सुरूच ठेवणार आहे, असेही पाटील म्हणाले.
एचसीएमटीआर आखणी मध्ये निर्णायक बदल होत नाही तोपर्यंत कोणताही आंनदोउत्सव समितीतर्फे साजरा होणार नाही व रिंग रोड बधितांनी याबाबत कोणाच्या भूलथापांनाही बळी पडू नये व अफवांवरती विश्वास ठेवू नये. शहरातील रिंग रोड बाधितांच्या हितासाठी आमदारांनी घेतलेला निर्णय हा लवकरच साकार होईल व रिंग रस्ता प्रकल्प बदल निर्णय ‘विशेष घटक’ लवकरच मंजूर करेल असे समितीला वाटते. आज मात्र आमदारांच्या पत्रामुळे वाल्हेकरवाडी, बिजलीनगर,चिंचवडेनगर,थेरगाव,कासारवाडी,पिंपळे गुरव परिसरातील लोकप्रतिनिधी आणि रिंग रोड बाधितांनी अंशतः आनंद साजरा केला, त्यांचा हा आनंद मोठ्या प्रमाणात साजरा लवकरात लवकर व्हावा असेच समितीला वाटते’, असे पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे.















