न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ डिसेंबर २०१९) :- समृद्ध जीवन फूडस इंडिया लिमिटेड कंपनीने लाखो नागरिकांची फसवणूक केली आहे. नागरिकांचे पैसे परत करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.
समृद्ध जीवनच्या १३७ स्थावर मालमत्ता ५१ वाहने शासनाने जप्त केल्या असून ८७५ बँक खाती गोठवली आहेत. एमपीआयडी कायद्यांतर्गत जप्त केलेली मालमत्ता विकून गुंतवणूकदारांची बुडालेली रक्कम परत मिळणार असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील अॅड. प्रवीण टेंभेकर यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाईची माहिती देण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनतर्फे पुणे येथे सभा आयोजित करण्यात आली. असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित केलेल्या सभेत अॅड. टेंभेकर बोलत होते. यावेळी प्रोग्रेसिव्ह वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष धनेश चट्टे पाटील, रुपेश माळी, महेश शेलार, आरती दातार, समाधान झाडबुके, विजय शेंडगे आदी उपस्थित होते. मालमत्तेची विक्री झाल्यानंतर पीडित गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे निश्चितपणे मिळतील, असा विश्वास अॅड. टेंभेकर यांनी व्यक्त केला.















