न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. १७ जून २०२६ :- मोरवाडी मेट्रो स्टेशनजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL), महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि शिवरुद्र प्रतिष्ठान (ट्रस्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा, टॅक्सी व कॅब चालकांसाठी आयोजित मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिराचा शुभारंभ भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते झाला. शिबिरात पहिल्याच दिवशी २०० हून अधिक चालकांनी सहभाग घेतला.
यावेळी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी शत्रुघ्न बापू काटे यांचा संत तुकाराम महाराजांची पगडी देऊन सत्कार केला. चालक बांधवांच्या आरोग्याची काळजी घेणे हे समाजाचे कर्तव्य असल्याचे मत काटे यांनी व्यक्त केले.
शिबिरात डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू निदान, रंग आंधळेपणा चाचणी, रक्तातील साखर तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप करण्यात आले. डॉ. बाबा कांबळे यांनी आगामी महिनाभर शहरातील विविध भागांत अशा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती दिली.














