- प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्याचा गौरव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १७ जून २०२६) :- पिंपरी-चिंचवडमधील प्रतिष्ठित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने नुकताच आपला १३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा केला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून कॉलेजच्या स्थापनेपासून आजवरच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांना कष्ट, सातत्य आणि ध्येयनिष्ठेच्या बळावर उज्ज्वल भविष्य घडवता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी विज्ञान शाखा समन्वयिका डॉ. सुनिता पटनाईक यांनी भावनिक मनोगत व्यक्त केले. गेल्या १३ वर्षांत संस्थेने दिलेल्या संधी, विश्वास आणि प्रोत्साहनामुळे आपली शैक्षणिक वाटचाल घडली, असे सांगताना त्या भावुक झाल्या. त्यांच्या मनोगताने संपूर्ण सभागृह भारावून गेले.
संस्थेचे संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा यांनी आपल्या भाषणात प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या कार्यनिष्ठा, धाडस, नेतृत्वगुण आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले. तसेच जुन्या-नव्या सर्व प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या योगदानाचाही गौरव केला. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले की, येथे शिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी भविष्यात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून स्पर्धेच्या युगात आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर यशस्वी आणि आदर्श नागरिक बनावा. तसेच विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. त्यांनी कॉलेजच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी कॉलेजचा शैक्षणिक दर्जा, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आणि विद्यार्थी-केंद्रित सुविधांवर प्रकाश टाकत प्राचार्या व सर्व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.
हा संपूर्ण कार्यक्रम प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. स्नेहा भाटिया यांच्या पुढाकाराने आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. सुकन्या बॅनर्जी यांनी केले.
या वर्धापन दिन सोहळ्यास संस्थेचे संस्थापक तथा सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, उपप्राचार्या डॉ. जयश्री मुळे, प्रा. जास्मिन फरास, प्रा. वैशाली देशपांडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
१३ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण करत प्रतिभा ज्युनिअर कॉलेज आता १४व्या वर्षात पदार्पण करत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कॉलेज सदैव कटिबद्ध राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.















