न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड | दिनांक १७ जून २०२६ :- रेल्वे आणि वन विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत तीन जणांकडून तब्बल 21 लाख 87 हजार 73 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी हितेश सुरेश कुलकर्णी (वय 35, रा. सुसगाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विक्रम पवार (रा. डांबरीतांडा, जि. जालना), निलेश वाकचौरे (रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) तसेच तपासात निष्पन्न होणाऱ्या इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 एप्रिल 2023 पासून आजपर्यंत कुणाल हॉटेल, काळेवाडी तसेच ऑनलाइन माध्यमातून आरोपींनी फिर्यादी व इतर दोघा साक्षीदारांना भारतीय रेल्वे आणि वन विभागात नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी फिर्यादी हितेश कुलकर्णी यांच्याकडून 7 लाख 87 हजार रुपये, अंकुश किसन राठोड यांच्याकडून 4 लाख 30 हजार रुपये आणि प्रशांत विठ्ठलराव जाधव यांच्याकडून 9 लाख 70 हजार 73 रुपये अशी एकूण 21 लाख 87 हजार 73 रुपयांची रक्कम घेतली.
त्यानंतर आरोपींनी संबंधितांना बनावट जॉइनिंग लेटर व इतर कागदपत्रे दिली. मात्र प्रत्यक्षात नोकरी न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गुरव करीत आहेत.















