- जैनाचार्य गच्छाधिपति पुण्यपाल सुरीश्वरजी यांच्या उपस्थितीत पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ जानेवारी २०१९) :- पुण्यातील जैन समाजाच्या गेल्या दोनशे वर्षांच्या इतिहासात प्रथमच एकाच परिवारातील पाच सदस्य जैन दीक्षा ग्रहण करणार असून, अत्यंत दुर्मिळ अशा या घटनेनिमित्त पाच दिवसाच्या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शांती जिनाराधक परिवाराचे दीपक गुंदेशा व अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
जैन धर्मातील तपागच्छ संप्रदायातील सर्वात मोठ्या असलेल्या स्वर्गीय गच्छाधिपति रामचंद्र सुरेश्वरजी समुदायाचे वर्तमान गच्छाधिपति पुण्यपाल सुरेश्वर जी महाराज त्यांच्या शिष्य परिवारातील अन्य चार आचार्य तसेच १०० हून अधिक साधु साध्वी यांच्या उपस्थितीत जैन धर्मातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या दीक्षा अंगीकार करणाऱ्या सदस्यांचा सन्मान, दीक्षा ग्रहण समारंभ, जैन संस्कृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन अशा विविध कार्यक्रमांचे शांतीजीन आराधक परिवारातर्फे दानाजी प्रेमाजी गुंदेशा यांच्या अधिपत्याखाली आयोजन करण्यात आले आहे.
४ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न होणाऱ्या जैनम जयति शासनम् या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या महोत्सवामध्ये ४ जानेवारी रोजी भवानी पेठ येथील मंदिरात गच्छाधिपति पुण्यपाल सुरीश्वरजी यांचे जाहीर प्रवचन, मंदिराची महापूजा, तसेच जय जिनेन्द्र प्रतिष्ठान येथे या महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या विशेष आर्ट गॅलरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
जैन धर्माची कठीण अशी दीक्षा अंगीकार करणाऱ्या देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या ७७ दीक्षार्थी मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ५ जानेवारी रोजी पुणे शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. सायंकाळी सात वाजता जय जिनेन्द्र प्रतिष्ठान येथे सत्कार समारंभ आयोजित केला आहे.
सहा जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता वैराग्य प्रेरक जनसंवाद या विशेष नाटिकेचे आयोजन करण्यात आले असून, सात जानेवारी रोजी जैन तीर्थंकर यांच्या पंचकल्याणक महोत्सवाचे आयोजन, तसेच दुपारी तीन वाजता दीक्षा अंगीकार करणाऱ्या मान्यवरांचा अंतिम विदाई समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
८ जानेवारी रोजी ३ मान्यवरांची दीक्षा संपन्न होणार असुन, तपागच्छ समुदायाचे स्वर्गीय गच्छाधिपति रामचंद्र सुरीश्वरजी महाराज यांच्या १०८ व्या दीक्षा दिना निमित्त गुरु स्मरण कार्यक्रम, तसेच विविध पुस्तकांचा प्रकाशन समारंभ आणि आगामी चातुर्मासाची विनंती करण्यासाठी देशभरातील विविध राज्यातून येणाऱ्या जैन समाजाच्या प्रमुखांच्या उपस्थितीत चातुर्मास निश्चितीची घोषणा असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. नागरिकांनी या सर्व कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शांती जिनाराधक परिवारा तर्फे करण्यात आले आहे.


















