- ज्ञा. ग. चौधरी लिखित ‘चौरंग’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ जानेवारी २०१९) :- कविता माणसाच्या जीवनातील सौंदर्यमूल्य जपते. प्रत्येक कवी स्वतंत्र प्रजापती असतो. तुकोबांच्या काव्याचा मणी ज्ञा. ग. चौधरी यांच्या हाती लागला आहे. त्याचे फलित म्हणजे त्यांचा ‘चौरंग’ हा काव्यसंग्रह आहे, असे मत संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केले. ज्ञा. ग. चौधरी लिखित चौरंग या कवितासंग्रहाचे प्रकाशन डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी वनसंरक्षक अधिकारी रंगनाथ नाईकडे, डॉ. अशोक बुचके, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, नारायण बहिरवडे, योगेश बाबर, प्रवीण पोकरणे, कुसुमावती देशपांडे, उर्मिला काळभोर आदी उपस्थित होते.
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, “चौधरी यांनी मानवी मनाच्या निद्रिस्त भावनांना जागविले आहे. कला आणि साहित्य यातून संस्कृती फुलते. वात्रटिका, चारोळी, कविता आणि अभंग या चार पायांवर चौरंग हा काव्यसंग्रह उभारला आहे. वात्रटिका मधून मानवी व्यंगावर भाष्य केले आहे. ज्ञा. ग. चौधरी यांनी प्रतिभेच्या स्पर्शाने अनुभवाला कविता संग्रहात उतरवले आहे.
खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “समाजाच्या आणि मानवी मनाच्या चारही दिशांना भटकून प्रगल्भ साहित्य वाचकांना देणारा ‘चौरंग’ हा कवितासंग्रह आहे. या कवितासंग्रहाच्या माध्यमातून वाचकांना चांगली मेजवानी मिळणार आहे. ज्ञा. ग. चौधरी यांचे लिखाण भरपूर आहे. सहज चर्चेतून देखील ते काव्याचा एखादा प्रकार मांडतात”
रंगनाथ नाईकडे म्हणाले, “ज्ञा. ग. चौधरी यांनी काव्याच्या सर्व प्रकारांना स्पर्श केला आहे. चारोळ्याच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले आहे.” “ज्ञा. ग. चौधरी हे संत ज्ञानेश्वरांप्रमाणे चर्चाशील आहेत. त्यांच्या या स्वभाव वैशिष्ट्यावर त्यांचा चौरंग हा काव्यसंग्रह आधारलेला आहे. मानवी आचार आणि विचारांच्या चार पायांवर हा चौरंग उभारलेला असल्याचे डॉ. अशोक बुचके यांनी सांगितले. तर ज्ञा. ग. चौधरी यांचे साहित्य वाचनीय असून ते आपण अनेक वर्षांपासून वाचत असल्याचे हभप पुरुषोत्तम महाराज पाटील म्हणाले.
प्रकाशन सोहळ्यात कवी ज्ञा. ग. चौधरी यांनी सांगितले की, आजवर कवितांचे अनेक प्रकार हाताळले. या विखुरलेल्या कवितांचा एक संग्रह असावा अशी मागणी वाचकांकडून आली आणि ‘चौरंग’ या काव्यसंग्रहाचा प्रवास सुरु झाला. वात्रटिका, अभंग, चारोळी आणि कविता यांच्या एकत्रिकरणातून चौरंग तयार झाला आहे.”
प्रकाशक नितीन हिरवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.















