- नवीन पोस्ट ऑफिसच्या इमारतीस स्थायी समितीची मंजुरी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 17 जून 2026) :- वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि वाढती वस्ती लक्षात घेता पिंपळे सौदागर परिसरात नवीन पोस्ट ऑफिस सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भातील प्रस्तावास आज बुधवारी झालेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभेत मंजुरी मिळाली, अशी माहिती, नगरसेविका अनिताताई संदीप काटे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना पोस्ट ऑफिसच्या कामांसाठी औंध किंवा पिंपळे गुरव येथे जावे लागते. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. त्यामुळे अनेक वर्षांपासून स्वतंत्र पोस्ट ऑफिसची मागणी करण्यात येत होती. आता ही मागणी पूर्ण होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.
महापालिकेच्या मालकीच्या मारुती मंदिर सांस्कृतिक भवनातील १२१०.५० चौ.फुट जागा पोस्ट ऑफिससाठी पाच वर्षांच्या कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देण्याच्या प्रस्तावास मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे पोस्ट ऑफिससाठी अधिक प्रशस्त इमारत उपलब्ध झाली असून नागरिकांना विविध टपाल, बँकिंग व शासकीय सेवा स्थानिक पातळीवरच मिळू शकतील, असे या पत्रकात अनिताताई काटे यांनी म्हटले आहे.
लवकरच नवीन पोस्ट ऑफिस सुरू होऊन ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी तसेच व्यावसायिकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा परिसराच्या विकासासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
– अनिताताई संदीप काटे, नगरसेविका पिंपरी-चिंचवड मनपा…














