- सत्ताधाऱ्यांची भविष्यात नगरसेवकांना आवरण्याची मोठी कसरत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२०) :- महापालिकेची डिसेंबर महिन्याची तहकूब सभा आज (शुक्रवारी) आयोजित केली होती. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. दरम्यान अग्निशामक दलाचे जवान विशाल जाधव यांना शहीद दर्जा देण्याचा प्रस्ताव विषय पत्रिकेवर होता.
याबाबत बोलताना भाजपचे अंबरनाथ कांबळे यांनी दापोडी दुर्घटनेला जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदार मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अधिकाऱ्यांना कारागृह दाखवावे. मृत्यू झालेल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून जीव परत येतो का? मी एक खड्डा खोदतो. त्यात अधिकाऱ्याला टाकतो आणि १५ लाख रुपये नुकसान भरपाई देतो, चालेल का, असा सवाल केला.
दरम्यान भाजपचे नगरसेवक सागर अंगोळकर यांनी त्यांचे वक्तव्य सभा कामकाजातून वगळण्याची सूचना केली. त्यानंतर महापौर ढोरे यांनी कांबळे यांचे वक्तव्य सभा कामकाजातून वगळण्याचे आदेश दिले. मात्र, सत्ताधारी नगरसेवकच आत महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आणत असल्यामुळे भविष्यात नगरसेवकांना आवरण्याची मोठी कसरत सत्ताधाऱ्यांना करावी लागणार आहे.












