न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०१९) :- दिघीतील भोसरीकडून येणाऱ्या गवळी सिटी पुढील सह्याद्री कॉलनीपासून ते ममता स्वीट कॉर्नर व तेथून पुढे दिघीतील विठ्ठल मंदीरापर्यंतचा एकूण सुमारे २ किमी चा रस्ता अत्यंत खराब झालेला असून तेथे चांगले डांबरीकरण करण्याबद्दल काही महिन्यांपुर्वी सारथी हेल्पलाईनवर तक्रार करुनही अद्याप काहीच कार्यवाही झालेली नाही. या भागातून दररोज हजारो वाहने भोसरीकडून ये जा करतात त्यामुळे या रस्त्याचे तातडीने चांगले डांबरीकरण करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
तसेच सह्याद्री कॉलनी ते ममता स्वीट चौक या रस्त्यात अनेक वीजेचे खांब रस्त्यात आहेत तेही बाजूला बसवावेत तसेच सह्याद्री कॉलनीतील दोन छोट्या रस्त्यावर वाहतूक पोलीसांच्या मदतीने वन वे करावे कारण दोन्ही बाजूने एकाच रस्त्यावर समोरासमोर कार आल्यास ट्रॅफिक जॅम होते. ममता स्वीट चौकापासून दिघी विठ्ठल मंदिरापर्यंतच्या एक दीड किमी रस्त्यावर सुमारे ७-८ बेकायदेशीर स्पीडब्रेकर आहेत. इतके सारे स्पीडब्रेकर्स वाहतूक पोलीसांची परवानगी घेउन उभारले आहेत का ? IRC चे सर्व निकष धाब्यावर बसवून हे सर्व स्पीडब्रेकर्स उभारले आहेत. त्यांचे स्लोप, रुंदी पुर्णपणे चुकीची आहे. ते काढून टाकून फक्त दोन तीनच ठेवावेत. अश्या बेकायदेशीर व धोकादायक स्पीडब्रेकर्समुळे आजपर्यंत असंख्य गंभीर अपघात व मृत्युही झालेले आहेत.
भारतीय रोड कॉंग्रेसचे सर्व निकष धुडकावून लावत कोठेही, मध्ये किमान अंतर न ठेवता, अर्ध्या किलोमिटर मध्ये 3-4 गतिरोधक, 45 अंशाच्या कोनात स्लोप न ठेवणे, अतिशय चढा स्लोप ठेवणे इ.इ.असे अनेक प्रकार चालू आहेत. पिंपरीत अमित वाघेरे नावाचा तरुण काही महिने स्पीडब्रेकरवरुन उडून कोमात होता व कोट्यावधी रु. खर्च करुनही वाचला नाही व पालिकेला त्याच्या कुटुंबियाना ५ लाख रु. द्यावे लागले. बेकायदेशीर गतिरोधकांमुळे पाठीच्या मणक्यांचे आजार, गाडीच्या शॉक ॲब्सॉबरवरती परिणाम, वारंवार होणारे छोटे मोठे गंभिर अपघात, वेळप्रसंगी होणारे मृत्यू हे सर्व नागरिकांना भोगावे लागते. गेल्या काही वर्षांत असंख्य लोक अश्या धोकादायक व बेकायदेशीर गतिरोधकांमुळे गंभीर जखमी झाली आहेत व काहींनी आपला जीवही गमावला आहे. परंतु तरीही प्रशासन काही करत नाही. काही महिन्यांपुर्वी दिघीतील AIT कॉलेजजवळील दोन गतिरोधक अनेक पाठपुराव्यांनंतर खुपच चांगल्या पद्धतीने दुरुस्त केले आहेत.
असे धोकादायक व बेकायदेशीर गतिरोधक उभारणे हा एक प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळ आहे व त्यामुळेच असे गतिरोधक उभारणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यावरती भारतीय दंडविधान संहिता (IPC) च्या कलम ३०७ व ३०४ खाली खुनाच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल करावेत म्हणून गेली अनेक वर्षे पुण्याचे पोलीस कमिशनर व ट्रॅफिकचे डी.सी.पी. यांना असंख्य ईमेल केले परंतु त्यांनीही याकडे सतत दुर्लक्षच केले आहे. तरी वरील सर्व कामांवर तातडीने कार्यवाही करावी, असे या पत्रात गोडांबे यांनी म्हटले आहे.















