- शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शाळेस आर्थिक मदत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२०) :- शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे चिंचवड विधानसभा शहर संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आकुर्डीतील नचिकेत बालग्राम या शाळेस आर्थिक मदत केली.
शिवसेना चिंचवड विधानसभा, शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी संस्थेचे अध्यक्ष भालचंद्र ब्रह्मेचा यांच्याकडे शाळेतील मुलांसाठी पुस्तके तसेच इतर क्रीडा साहित्य खरेदीसाठी दहा हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी संस्थेच्या मुख्याध्यापिका सौ. नयना मावळे, शिवसेना शाखाप्रमुख नितीन बोंडे, प्रदीप बेळगावकर, ओम परदेशी, युवासेनेचे राहुल पालांडे तसेच संस्थेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आपले आयुष्य महाराष्ट्रातील गोरगरीब जतनेच्या कल्याणासाठी खर्ची केले. बाळासाहेबांनी माणूस घडविला. त्याला आकार दिला. महाराष्ट्राच्या जनतेत स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वावलंबी केले. शिक्षणाद्वारे आजचा विद्यार्थी पुढे जाऊन, आदर्श नागरिक बनेल, त्यांच्यातल्या कलागुणांनी समाजाला योग्य दिशा मिळेल. यासाठी आज विद्यार्थी घडला पाहिजे. जागतिक वाचन दिनाच्या निमित्ताने मुलांसाठी पुस्तके विकत घ्यावे. त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होईल, असे मत संतोष सौंदणकर यांनी यावेळी व्यक्त केले.















