न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ फेब्रुवारी २०२०) :- मुंबईसह महाराष्ट्रात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाकिस्तानी, बांगलादेशींना घुसखोरांना हाकलून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उद्या महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. जास्तीत जास्त लोकांनी मोर्चामध्ये सहभागी व्हावे, यासाठी सोशल मीडियावरुन जोरदार प्रचार केला जात आहे.
हिंदूह्दयसम्राट आपल्याला बोलू नका असे राज ठाकरेंनी बजावल्यामुळे काही कार्यकर्त्यांनी हिंदूजननायक अशी टी-शर्ट छापली आहेत. काहींनी मोर्चासाठी खास राज ठाकरेंच्या आवाजातील व्हिडीओ बनवले आहेत. एकूणच महामोर्चासाठी मनसेकडून जोरदार वातावरणनिर्मिती सुरु आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात देखील महत्वाच्या परिसरात पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. तसेच त्याचे फोटो व्हाट्सअॅपवरून पसरविण्यात येत आहेत. राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून नवीन भूमिका हाती घेतली आहे. देशासह महाराष्ट्रात बेकायदा राहत असलेल्या बांगलादेशी आणि पाकिस्तानमधील नागरिकांना हाकलून दिले पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली.
भारत म्हणजे काही धर्मशाळा नाही, पाकिस्तान आणि बांगलादेशी नागरिकांना हाकलून दिले पाहिजे. महामोर्चात सामील व्हा असे आवाहन या फलकाद्वारे नागरिकांना करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर मनसेचे अध्यक्ष सचिन चिखले यांनी दिली.















