न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपुर्ण आयुष्याचे नियोजन राजमाता जिजाऊंनी केले. स्वराज्यासाठी एक स्त्री काय करु शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजमाता जिजाऊ आणि एक उत्तम, चारित्र्य संपन्न, मुत्सद्दी, जनतेच्या हितासाठी झगडणारा, झटणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज असे गौरवोद्गागार महाराष्ट्राचे ख्यातनाम शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी काढले.
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे हस्ते संभाजीनगर, चिंचवड येथे छत्रपती शिवाजी महाराज समाजप्रबोधन पर्वाचे उद्धाटन झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, अ प्रभाग अध्यक्ष शर्मिला बाबर, नगरसदस्या मंगला कदम, अनुराधा गोरखे, माजी नगरसदस्य नारायण बहिरवाडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, साई किरण मंडळाचे संस्थापक कुशाग्र कदम, पदाधिकारी संजय कलागते, प्रविण यादव, निलेश नारखडे, मंगेश गुंजाळ, संतोष व-हाडी, गिरीश तेलंग, नितीन बागुल, किरण वाघुळदे, अजित कडुलकर, नितीन जाधव आदी उपस्थित होते.
आई- राजमाता जिजाऊ या विषयावर बोलताना प्रा. नितीन बानगुडे पाटील म्हणाले, ज्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्या छत्रपतींनी स्वराज्य घडविले आणि असे सैन्यदल तयार केले की त्याचा अभ्यास आजही जगातील १५६ राष्ट्र करतात, हे व्यवस्थापन राजमाता जिजाऊंच्या मनातून तयार झालं असुन त्यांनी शिवाजी महाराजांवर घडविलेल्या संस्कारातून स्वराज्यासाठी एक अलौकीक महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने निर्माण
झाला, असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांनी केले. तर सुत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक यांनी मानले.


















