सत्ताधारी भाजप व मुजोर प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत – दत्ता साने…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड मनपाच्या करसंकलन विभागाकडून थकीत मिळकतकर व शास्तीकर भरण्याबाबत नागरिकांना नोटिसा पाठविल्या आहेत. सात दिवसाच्या आत मिळकतकर न भरल्यास अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाच्या पथकाकडून बांधकाम पाडण्याची कारवाई करण्यात येणार आहे. वस्तुत; काही दिवसांपूर्वी पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मिळकतकर माफ करण्याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. त्याचा अद्याप निर्णय प्रलंबित आहे. शिवाय महापालिका सर्वसाधारण सभेत शास्तीकर शंभर टक्के कर माफ करावा, असा ठराव करण्यात आलेला आहे.
या ठरावावर शासनाचा निर्णय प्रलंबित आहे. मात्र, मनपा प्रशासन घाई करून मालमत्ता जप्तीच्या कारवाईची भीती दाखवत आहे. महापालिकेने दडपशाही आणि हुकूमशाही पद्धतीचे काम बंद करावे. शहरातील कोणत्याही नागरिकाने मूळकर आकारणी प्रमाणे कर भरून शास्तीकर भरण्यास नकार द्यावा. शासन निर्णय येईपर्यंत कोणीही शास्तीकर भरू नये, असे आवाहन माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आज सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.
पुढे बोलताना दत्ता साने म्हणाले की, शहरात सुमारे दोन लाखांच्यावर अनधिकृत बांधकामे आहेत. सहा महिन्यापूर्वी सरकारने अनधिकृत बांधकामे दंड आकारून काही अटी-शर्तीवर नियमित करण्याचा निर्णय घेतला. भाजपच्या मंडळींनी पेढे वाटून स्वागत केले. परंतु, निर्णयानुसार दंडाची रक्कम सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेरची असल्यामुळे अनाधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी किरकोळ अर्ज आलेले आहेत. शास्तीकर, रेडझोनची अवस्था अशीच आहे. प्रत्येक वेळी शास्तीकर, रेडझोन रद्द करू, अशी प्रत्येक निवडणुकीत आश्वासने द्यायची, जनतेला खोटा दिलासा द्यायचा, कृती मात्र शून्य. त्यामुळे नागरिकांमध्ये या भाजपविषयी असंतोष वाढत चाललेला आहे.
भाजपच्या नाकर्तेपणामुळे व पदाधिकाऱ्यांमुळे शास्तीकर नावाचा राक्षस नागरिकांच्या मानगुटीवर अजूनही बसलेलाच आहे. भाजपाचे सरकार आश्वासनांचे नुसते गाजर दाखवित आहेत, असेही साने यावेळी म्हणाले.