न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगरमधील वायसीएम रुग्णालयाच्या आवारातील वाहनतळामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना शहर महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय यादव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांच्याकडे निवेद्नाद्वारे नुकतीच केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात जिल्हा तसेच राज्याबाहेरून अनेक रुग्ण त्यांच्या नातेवाईकांसोबत उपचारासाठी येत असतात. त्यांच्या वाहनांना रुग्णालयाकडून वाहनतळ शुल्क आकारण्यात येत आहे. वाहनतळ शुल्कामुळे रुग्णालयामध्ये येणारे रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हॉस्पिटलच्या बाहेरच रस्त्यावर वाहने पार्क करून जातात. त्यामुळे रूग्णालयाबाहेरील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होऊन अपघाताची शक्यताही निर्माण होऊ शकते. स्थानिक नागरिकांनाही दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिणामी रोज येणाऱ्या रुग्णवाहिका, बस आणि इतर अनेक वाहने यांनाही अडथळा निर्माण होत आहे.
वायसीएम रूग्णालया शेजारीच डॉ. डी. वाय. पाटील हे खासगी रुग्णालय आहे. या रुग्णालयाकडून रुग्णाच्या नातेवाईकांना पार्किग व्यवस्था मोफत उपलब्ध आहे. खासगी रुग्णालय पार्किंग व्यवस्था मोफत उपलब्ध करीत असेल तर, वायसीएम हे सरकारी रुग्णालय आहे. या ठिकाणी मोफत पार्किंग उपलब्ध व्हायलाच हवे. त्यासाठी आयुक्त या नात्याने आपण त्वरित उपाययोजना करावी, असे या निवेदनात यादव यांनी म्हटले आहे.
शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी, पुणे जिल्हा अध्यक्ष महेश केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी रविराज मांडवे, गुरुनाथ शिनगारे, कु. कमलेश परदेशी, कु. विनय साळवी आदी उपस्थित होते.












