न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ८ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या अंतर्गत रस्त्यांची तसेच मुंबई – पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्यात येणार आहे.
१ हजार ६७० किलोमीटर लांबीच्या रस्ते साफसफाई कामासाठी सहा विविध ‘पॅकेजेस’ मध्ये विभागणी करत ७ वर्ष कालावधीसाठी ६४७ कोटी रुपयांची निविदा महापालिकेने काढली आहे. या निविदेमुळे ११०० कामगार बेरोजगार होणार आहेत.
याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय विरोधकांसह सफाई कामगारांनी महापालिकेसमोर आज ठिय्या आंदोलन केले. आंदोलकांनी महापालिकेचे दोन्ही प्रवेशद्वार काही काळ बंद केले होते. त्यामुळे आयुक्तांसह अधिकारी महापालिकेत अडकले होते. यावेळी आंदोलनकर्त्यानी आयुक्तांना निवेदन देत, निविदा रद्द करण्याची मागणी केली.











