- शहरातील मिळकतींना दोन ते अडीचपट मिळकतकर १ एप्रिल पासून लागू …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२०) :- मिळकतकर वाढीच्या संदर्भात पिंपरी – चिंचवड महापालिका सभागृहात कोणताही निर्णय गुरूवारी ( दि . २० ) झाला नाही. त्यामुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आपल्या अधिकार कक्षेत सन २००६ पुर्वीच्या सुमारे २ लाख २४ हजार जुन्या निवासी व बिगरनिवासी मिळकतीच्या कर योग्य मूल्य पद्धतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यामुळे त्या मिळकतींना दोन ते अडीचपट मिळकतकर १ एप्रिल २०२० पासून लागू होणार आहे. कर योग्य मूल्य पद्धतीने आणि भांडवली मूल्य पद्धतीने मिळकत करात वाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवला होता. सभा तहकूब झाल्याने त्यावर कोणताही निर्णय झाला नाही.
महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम ९९ नुसार कराचा दर निश्चित करण्याचे पालिका सभेचे अधिकार आहेत. कराचे दर निश्चित करण्याचा निर्णय २० फेब्रुवारीपर्यंत घेणे आवश्यक आहे. मात्र, सभागृहात कोणतीच चर्चा न झाल्याने आयुक्तांनी आपल्या अधिकार कक्षेत त्यावर निर्णय घेतला आहे. कर योग्य मूल्य पद्धतीने करयोग्य मूल्य मिळकतकरात वाढ करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. हा दर सन २००६ वर्षापूर्वीच्या जुन्या मिळकतीस तसेच सन २०१६ पर्यंतच्या मिळकतींना लागू होणार आहे.
जुन्या मिळकतींना ‘ डिप्रीसेशन ‘ नुसार दर लावला लाणार आहे. त्यासाठी ‘ नॅशनल रेट ‘ चा आधार घेतला जाणार आहे, असे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले. त्यामुळे सन २०१६च्या नंतरच्या दराप्रमाणे जुन्या मिळकर्तीचे कर योग्य मूल्य असणार आहे. या मुळे पालिकेच्या तिजोरीत सुमारे १०० ते १५० कोटींची वाढ होणे अपेक्षित आहे. सन २००६ पूर्वीच्या २ लाख ३४ हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतीची नोंद आहे. सन २०१५ – १६ पर्यंत त्यात १ लाख ९६ हजार मिळकतींची भर पडली आहे.