न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ फेब्रुवारी २०२०) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले यांनी २०१६ साली भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजासाठी ‘दादा भिकू इदाते कमिशन’ नेमले होते. या कमिशनने सादर केलेला अहवाल सरकारने स्विकारला आहे. त्यातील शिफारशी ताबडतोब लागू कराव्यात. या प्रमुख मागणीसाठी तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चा’ (नियोजित) या संस्थेच्या वतीने मंगळवारी (दि. २५) राज्यव्यापी क्रांतीमोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय मारुती कदम यांनी पिंपरी येथे शनिवारी (दि. २२) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ॲड. कैलास भोसले, अविनाश इंगळे, संतोष कदम, शामराव वाकोडे, बलराज काटे, शाहिर श्रीकांत रेणके, भारत भोसले, अंकुश भोरे, सोमनाथ इंगळे आदी संस्थेचे राज्यस्तरीय प्रतिनिधी उपस्थित होते.
भारताला स्वातंत्र्य मिळून ७२ वर्षे झाली. तरी देखील राज्यातील साडेचार कोटी व देशातील तीस कोटींहून जास्त भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज आजही भटकेच जीवन जगत आहेत. केंद्रात व राज्यात अनेक पक्षांचे सरकार आले व गेले. परंतू भटक्या विमुक्त जाती जनजाती समाजाला कोणतेही सरकार न्याय देऊ शकले नाही. पुरोगामी विचारांचा वसा घेऊन राजकारण करणा-या राज्यातील एकाही पक्षाने भटक्या विमुक्त समाजाला विधानसभेत प्रतिनिधीत्व दिले नाही. भटक्या विमुक्त समाजाचा एकही खासदार नाही. हा समाज पारंपरिक पध्दतीने आपले जीवन व्यथित करीत असून शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, उद्योग, व्यापार यापासून या वंचित समाजाला न्याय मिळावा आदी प्रमुख मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी पिंपरीत होणा-या भटक्या विमुक्त जाती जनजाती समाज क्रांती मोर्चात राज्यभरातून १० हजारांहून जास्त समाजबांधव उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी सकाळी ११.०० वाजता आकुर्डी खंडोबा माळ मंदीर येथून पुणे मुंबई महामार्गाने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत क्रांतीमोर्चा काढणार आहेत. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल, अशी माहिती संजय कदम यांनी दिली.


















