न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२०) :- शहरातील रस्ते सफाईचे काम स्वीपर मशिनने केले जाणार आहे. त्यामुळे असंख्य कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या या निर्णयाच्या विरोधात ‘ फ ‘ क्षेत्रीय कार्यालयाच्या एकूण २३० सफाई कामगारांनी मंगळवारी (दि. २५) काम बंद आंदोलन केले. त्यामुळे परिसरातील रस्ते सफाई झाली नाही.
पालिकेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यांसोबतच ६, १२ व १८ मीटर रूंदीचे सर्व रस्ते रोड स्वीपर मशिनने स्वच्छ केले जाणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. ही निविदा प्रक्रिया राबविल्याने सुमारे १ हजार कामगार बेकार होणार असल्याने ती रद्द करावी, अशी मागणी पिंपरी – चिंचवड शहर स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे कामगारांनी सांगितले.















