- उपस्थित भाजप नगरसेवकांची अनुकूल मते भासवून रिंग रोड बाधितांची केली फसवणूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मार्च २०२०) :- महापालिकेची सर्वसाधारण सभा जानेवारी मध्ये तहकूब करण्यात आली. त्यानंतर सदर सभा ४ फेब्रुवारी २०१९ रोजी संपन्न झाली. त्यामध्ये अनेक ठराव उपसुचनेद्वारे मांडण्यात आले. सदर ठराव मांडण्याच्या अगोदर राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे व अपक्ष सभासद नगरसेवकांनी चुकीच्या सत्ताधारी कार्यप्रणालीला प्रचंड विरोध केला व त्यामुळे सभेत गोंधळ झाला. अश्या गोंधळाच्या वातावरणात सत्ताधारी पक्षाने ३६४ क्रमांक ठरावाची उपसूचना मांडली. त्या उपसूचना ठरावामध्ये एचसीएमटीआर निधी वळविण्याचा प्रमुख विषय होता. परंतु, सदरचा विषय हजारो रिंग रोड बधितांच्या निगडित असल्याकारणाने विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विरोध केला. परंतु, राजकीय दबावापोटी सत्तेतील उपस्थित भाजप नगरसेवकांनी ८१ मते अनुकूल असे भासवून सदर ठराव संमत केला.
मात्र, सभागृहात भाजप पक्षाचे ८१ पैकी फक्त ६६ सदस्यच उपस्थित होते व १५ नगरसेवक मात्र अनुपस्थित होते. असे स्पष्ट असताना ठराव संमत करण्यासाठीचा अनुकूल ८१ ह्या आकड्याची सत्ताधा-यांनी कशी जुळवाजुळव केली याचे स्पष्टीकरण मात्र, आता प्रशासन व सत्ताधाऱ्यांनी देणे क्रमप्राप्त ठरते. विशेष म्हणजे ८१ आकडा पूर्ण करण्यासाठी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या विरोधकातील ४१ नगरसेवकांमधीलच १५ जणांची मंजुरी विरोधकांना न सांगता घेण्यात आली, असे प्रशासनाकडून मिळालेल्या हजेरी पत्रकातील माहीतीवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे हा ३६४ क्रमांकाचा ठराव मंजूर करण्यासाठी केलेला आटापिट्याची भनक सुध्दा विरोधकांना लागू दिली नाही.
दिनांक ४/०२/२०१९ च्या सर्वसाधारण तहकूब सभेस १३३ नगरसेवकांपैकी १०७ नगरसेवक उपस्थित होते. सत्ताधारी भाजपचे ६६ नगरसेवक व विरोधकांचे ४१ नगरसेवक उपस्थित होते. चुकीच्या ठराव मंजुरी पद्धतीमुळे त्या दिवशी सदरच्या उपस्थित नगरसेवकांनी सादर ठरावांना प्रचंड विरोध केला. विरोधाच्या वातावरणातच उपसुचना विषय क्रमांक ४ मध्ये ठराव क्रमांक ३६४ अंतर्गत “पिंपरी चिंचवड महानगर पालिकेमार्फत रहाटणी येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा ३० मीटर रुंदीचा उच्च क्षमता द्रुतगती मार्ग विकसन करनेच्या निवेदेअंतर्गत (नि.नो. क्रमांक ४१/१-२०१७/१८) पालिकेच्या ताब्यात असलेल्या क्षेत्रात रस्ता विकसित करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित जागेची बाब न्यायप्रविष्ट असल्यामुळे ताब्यात मिळण्यास अनिश्चितता विलंब होणार आहे. त्यामुळे तेथील काम पूर्ण करणे शक्य नाही. म्हणून सदरच्या कामात निविदा रक्कम अखर्चित राहणार आहे.
सदर निविदा (नि. नो.क्रमांक ४१/१-२०१७/१८) रकमेतून मौजे पिंपळे गुरव, सुदर्शन नगर ते पवना नदी आणि पवना नदी ते दापोडी पर्यंतचा ३० मी चा एचसीएमटीआर रस्ता करणे हे काम करणे शक्य आहे. तरी, रहाटणी येथे कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्च क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) विकसित करणे. नि.क्र.४१/०१/२०१७-१८ या कामाच्या अंतर्गत मौजे पिंपळे गुरव सुदर्शन नगर चौक ते दापोडी पर्यंतचा एचसीएमटीआर रस्ता विकसित करण्यास मान्यता देण्यात येत आहे. “असा ठराव संमत केला. परंतु ठराव ८१ मतांनी अनुकूल असा मंजूर दाखविण्यात आला परंतु सत्य प्रथमदर्शनी दाखविलेले ८१ चे अनुकूल संख्याबळ हे बनावट तथा खोटे असल्याचे आता उघड झाले आहे. कारण सत्ताधा-यांचे १५ नगरसेवक त्या दिवशी अनुपस्थित होते हे मात्र त्यांच्या नोंदीमध्ये लक्षात राहिले नाही.किंबहुना विरोधक ह्या बाबत पडताळणी करणार नाहीत असेच आजपर्यंत सत्तेच्या धुंदीमध्ये सत्ताधा-यांना वाटत होते. सरतेशेवटी विरोधकांना मात्र आता लोकशाही च्या मंदिरात सत्ताधीश संख्याबळाचा कसा गैरवापर करतात ह्याचे उत्तम दर्शन महापालिकेत घडले आहे. अश्या खोटया मताच्या अनुकूल आकडेवारीमुळे मंजूर झालेले ठराव हे कायद्याने नियमबाह्यच ठरतात व त्यानुसार करण्यात आलेली कामे भ्रष्टाचारास खतपाणी घालण्याचेच कार्य करतात.
सत्ताधारी भाजपने शहरवासीयांच्या कररूपी करोडो रुपयांचा चुराडा केला आहे. सत्ताधाऱ्यांनी ३६४ चा उपसुचनेतील ठराव मनमानी पद्ध तीने खोट्या अनुकूल आकडेवारीने संमत केला. अश्या पद्धतीने ठराव मंजूर करून, महापालिका सत्ताधा-यांनी लोकशाहीचा गळा घोटला आहे. –विजय पाटील, मुख्य समन्वयक, घर बचाव संघर्ष समिती, पिंपरी चिंचवड शहर.















