न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ मार्च २०२०) :- शैक्षणिक क्षेत्रात मुस्लीम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची ही भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या आठवडय़ात केलेल्या घोषणेच्या परस्परविरोधी असल्याने महाविकास आघाडीमधील मित्रपक्षांच्या भूमिका वेगळ्या असल्याचे उघड झाले आहे.
याच पार्श्वभूमीवर आता भाजपाने शिवसेनेला एक आगळीवेगळी ऑफरच देऊ केली आहे. भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुस्लीम आरक्षणावरुन महाआघाडीत मतभेदाबद्दल बोलताना, ‘या मुद्द्यावरुन वेळ पडल्यास आम्ही शिवसेनेच्या पाठिशी उभं राहू’ असं मत व्यक्त केलं आहे. मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केलं. त्यामुळे मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाआघाडीत बिघाडी झाल्यास राज्यात पुन्हा युती सरकार सत्तेत येऊ शकते अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु झाली आहे.


















