न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित पवनाथडी २०२० जत्रा उत्साहात सुरु आहे. पवनाथ़डीचे उद्घाटन ४ मार्च रोजी नवी सांगवीच्या पी.डब्ल्यू.डी मैदानावर झाले. पहिल्या दिवसापासूनच पवनाथडीला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. खासकरुन महिलांनी बनवलेल्या लोणची, पापड, मसाले यांना मागणी आहे.
पवनाथडी जत्रेस आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसदस्या शारदा सोनवणे, आरती चोंधे, सीमा चौगुले, माधवी राजापुरे नगरसदस्य हर्षल ढोरे, सागर आंगोळकर, संतोष कांबळे, माजी नगरसदस्य भाई सोनवणे, ‘ह’ प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सहाय्यक आयुक्त तथा नगरसचिव उल्हास जगताप, जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले आदी मान्यवरांनी भेट दिली.
जत्रेत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला ‘मामाचे गाव’ साकारण्यात आले आहे. त्यामुळे प्रवेशकेल्यापासूनच जत्रेचा माहौल पाहायला मिळाला. तरुण, महिला यांच्यासाठी खास सेल्फी पॉइंट येथे करण्यात आले आहे. त्यामुळे तरुणांचे ग्रुप फोटो काढण्यासाठी या ठिकाणी गर्दी होत आहे. तसेच या ठिकाणी टेलिस्कोपमधून चंद्र पाहण्याची सोयही करण्यात आली आहे.
यंदाच्या पवनाथडीमध्ये वैविध्यपूर्ण वस्तूंची रेलचेल पाहायला मिळाली. खाद्यपदार्थांबरोबरच खास शिवलेले खणाचे ड्रेस, वुडन आर्टच्या आकर्षक वस्तू , मातीच्या वस्तू, डाएट फराळाचे पदार्थ, लाकडी खेळणी पाहायला मिळाली. तसेच खास गावाकडची चव असलेले पापड, लोणची, मसाले यांचीही रेलचेल होती. तसेच शहरात न मिळणा-या अशा गव्हाच्या कुरडया, हाताने बनवलेल्या गव्हाच्या शेवया यांना महिलांनी पसंती दिली.
पवनाथडीमध्ये दरवर्षी आवर्जुन येत असलेल्या मंजुषा रत्नपारखी म्हणाल्या की, पवनाथडी मध्ये खाण्याची रेलचेल असतेच. मात्र काही निवडक पदार्थ आम्ही पवनाथडीतून घेतोच. त्यात लोणची, गव्हाच्या शेवया, मसाले यांचा समावेश असतो. महिलांच्या हातचे चविष्ट पदार्थ खाण्याची पवनाथडी मुळे संधी मिळते. यंदा स्टॉलसह चांगले मनोरंजनात्मक कार्यक्रमही ठेवल्याने प्रेक्षकांनी कार्यक्रमांचा आनंद घेतला. गृहिणी सुचित्रा गवळे म्हणाल्या की, पवनाथडी मध्ये यंदा उत्तम डेकोरेशन केले होते. यात साकारलेल्या मामाच्या गावामुळे आम्हाला आमच्या गावची आठवण झाली. यावेळी पवनाथडीमध्ये खाण्याचे स्टॉल, वस्तूविक्री यांचे वेगळे विभाग केल्याने सोयीस्कर झाले आहे. मुलांसाठी खेळण्यांचा विभागही आहे.
रश्मी घाटपांडे म्हणाल्या की, महिलांनी साकारलेल्या नाविन्यपूर्ण वस्तू एकाच छताखाली पाहायला मिळतात. यावेळी लाकडी खेळणी आणि मातीच्या वस्तू खरेदी करता आल्या. महिलांना पवनाथडीमुळे चांगले प्रोत्साहन आणि व्यासपीठ मिळते आहे. खरेदी विक्रीच्या स्टॉलसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलही पवनाथडीत पाहायला मिळते आहे. पवनाथडीमध्ये दररोज सायंकाळी वेगवेगळ्या स्थानिक आणि इतर संस्थांना कार्यक्रम सादर करण्याची संधी महापालिकेने दिली आहे. पवनाथडीच्या तिस-या दिवशी दिग्दर्शक संतोष पवार यांचे यदा कदाचित हे विनोदी नाटक सादर झाले. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.