न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- महापालिकेने केलेली करवाढ पिंपरी चिंचवडमधील जुन्या रहिवाश्यांच्या माथी मारण्याचे महापाप सत्ताधारी व आयुक्त यांच्या संगनमतानेच आहे की काय? असा सवाल संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रविण कदम यांनी महापालिका आयुक्तांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महपालिकेचा कारभार चालवण्यासाठी आयुक्त साहेबांना पैश्याची गरज आहे. त्यासाठी त्यांनी पिंपरी-चिंचवड मधील जुन्या २००७ पूर्वी ज्यांनी घराचा ताबा घेतला आहे. अश्या सर्व रहिवाश्यांना २०२०-२१ पासून दरवर्षी अडीचपट जास्त मिळकत कर भरावा लागणार आहे. ही वाढ खूपच जास्त व अनाठायी आहे. ज्यांनी १५ ते २० वर्षापूर्वी आपल्या आयपतीप्रमाणे १० लाखाला फ्लॅट घेतला. त्याला आत्ता निविन इमारतीत एक कोटीला फ्लॅट घेणाऱ्या व्यक्तीइतका मिळकत कर भरावा लागणार आहे.
पिंपरी चिंचवड भागातील जुन्या सर्व भागात हा भुर्दंड लागू होणार आहे. त्यामुळे आकुर्डीगाव, पिंपरीगाव, अजमेरा कॉलनी, वल्लभनगर, एम्पायर इस्टेट, चिंचवडगाव, भोसरीगाव येथील सर्वच रहिवाश्यांना हा फार मोठा कर दर वर्षी भरावा लागणार आहे. त्यामुळे साहजिकच घरभाडेही वाढणार आहे. पिंपरी चिंचवड भागात राहणे महाग होईल. महानरपालिकेत एक रुपयाचे काम तीन रुपयात करून घेतले जाते. अधिकाऱ्यांना हताशी धरून कॉन्ट्रॅक्टर किती मोठ्या प्रमाणात महापालिकेचा पैसा ओढत आहेत, हे आपण रोजच वर्तमानपत्रात वाचत आहोत.
माननीय आयुक्त साहेबांनी प्रॉपर्टी टॅक्स वाढवण्यापेक्षा महानगर पालिकेचा कारभार अधिक पारदर्शी करावा. आयुक्त साहेबांनी ही कर वाढ मागे घ्यावी ह्यासाठी सर्व सोसायट्यांनी एकत्र येऊन ह्या विरूद्ध आवाज उठवण्याची गरज आहे. ते काम संभाजी ब्रिगेड प्रत्येक विभागात जाऊन या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून देणार आहे. हा लोकलढा संभाजी ब्रिगेड लढनार आहे. जनतेच्या भावनेशी प्रस्थापित राजव्यवस्था खेळत असेल तर, संभाजी ब्रिगेड स्वस्थ बसनार नाही. आयुक्त साहेबानी तातडिने निर्णय मागे घ्यावा, अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार आहे. यात काहीही नुकसान झाल्यास सर्वस्वी सरकारची जबाबदारी असेल, असे या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे.












