न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ मार्च २०२०) :- जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने प्रभाग १० मधील दत्तनगर, विद्यानगर परिसरातील कष्टकरी महिलांसाठी एक दिवसीय व्यवसाय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन नगरसेविका अनुराधा गोरखे व त्यांच्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
त्यावेळी बोलताना गोऱखे म्हणाल्या, कुटुंबातील एक महिला सक्षम असेल तर ते संपूर्ण कुटुंब सक्षम बनते, आजच्या महिला स्वतः प्रथम आपल्या आरोग्याकडे लक्ष देऊन स्वतःला सक्षम होणे गरजेचे आहे, प्रत्येक महिले मध्ये काहीना काही गुण असतो तो त्यांनी स्वतः शोधला पाहिजे आपली आवड जोपासली पाहिजे व आपल्याला काय नेमकं आवडतं याची निवड करून त्यामध्येच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय चालू केले पाहिजेत. आज घर बसल्या पापड लाटणे, लोणची करणे, कागदी पिशव्या तयार करणे यासारखे अनेक व्यवसाय आहेत. जे आपण करू शकतो. त्यासाठी फक्त त्या महिलेची आत्मीयशक्ती जागृत होणे गरजेचे असते व ती जागृत होण्यासाठी व्यावसायिक प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात निवृत्त अधिकारी वैजनाथ पापुले यांनी महिलांना विविध घरगुती व्यवसाय कसा करावा या विषयी मार्गदर्शन केले. विविध प्रकारच्या कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण या वेळी त्यानी दिले. तसेच महिलांचे आरोग्य, स्वच्छता, कोरोना व्हायरसपासून घ्यावयाची काळजी या विषयीची मार्गदर्शन डॉ मानसी पाटील यांनी केले. या प्रसंगी मा. नगरसेविका जयश्री वाघमारे, आशा गायकवाड उपस्थित होत्या. कोमल शिंदे यांनी सूत्रसंचलन केले.












