न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ मार्च २०२०) :- पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्त आणखी एक रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर या संबंधित परिसराच्या निरीक्षणासाठी ३७ शीघ्र कृती पथके तातडीने कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहिती, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी दिली.
पिंपरी – चिंचवड महापालिकेंतर्गत ६५ व्यक्तींच्या घश्यातील द्रव्याची ( लाळ ) नमुने तपासणीसाठी पुण्याच्या एनआयव्हीकडे पाठविण्यात आले आहेत. त्या पैकी ४५ व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ११ व्यक्तींच्या तपासणीचा अहवाल प्रलंबित आहे.
तर रविवारी (दि. १५) एक रुग्ण येथे नव्याने आढळला असून अद्यापपर्यंत ९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या पूर्वी ३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. ९ रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली. ६ ते ९ मार्च दरम्यान दुबई व जपान येथे प्रवास करून आलेल्यांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेले नातेवाईकांची माहिती घेऊन त्यांना होम क्वॉरटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.













